अखिलेश यादव यांचा आमदारकीचा राजीनामा
अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांनीही सोडली आमदारकी
वृत्तसंस्था/ लखनौ
सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील करहाल विधानसभा मतदारसंघाचा आणि विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यांच्यासोबतच अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोघांनीही विजय संपादन केल्यामुळे त्यांनी विधानसभेची जागा सोडत आता दिल्लीत जाणे पसंद केले आहे. त्यांनी या जागा सोडल्यामुळे आता विधानसभेसाठी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.
कन्नौजमधून खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी करहाल विधानसभा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांच्या भेटीनंतर शनिवारी लखनौमध्ये चार दिवसांपूर्वीच यासंबंधी घोषणा केली होती. साहजिकच आता अखिलेश दिल्लीचे राजकारण करणार आहेत. मैनपुरी जिल्ह्यातील करहाल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार एस. पी. सिंह बघेल यांचा 66 हजार मतांनी पराभव करून अखिलेश यादव आमदार झाले होते.
विधानसभेनंतर लोकसभा निवडणुकीतही समाजवादी पार्टीने चांगली कामगिरी नोंदवली आहे. 2022 मध्ये अखिलेश यादव यांनी करहाल विधानसभा मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर आता 2024 मध्ये कनौज मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरत भाजप उमेदवार सुब्रत पाठक यांचा 1 लाख 70 हजार 922 मतांनी पराभव केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या विजयानंतर सपा आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राज्यात आघाडीने एनडीएचा पराभव केल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. याचदरम्यान उत्तर प्रदेशमधून भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी आम्ही विधानसभा निवडणूकही एकत्र लढू, असे अजय राय यांनी जाहीर केले आहे. तसेच रायबरेली मतदारसंघातून आपले प्रतिनिधित्व कायम ठेवण्यासाठी राहुल गांधींना आवाहन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.