For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखिलेश यादव कनौजमधून लढणार

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
अखिलेश यादव कनौजमधून लढणार
Advertisement

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी अखेर लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी गुरुवारी कनौज या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. इतके दिवस त्यांच्या निवडणूक लढविण्यासंबंधी अनिश्चितता होती. कनौजमधून त्यांचे पुतणे तेज प्रताप यादव यांनी उमेदवारी अर्जही सादर केला होता. तथापि, समाजवादी पक्षाने पुन्हा एकदा उमेदवार बदलला आहे. आता प्रत्यक्ष अखिलेश यादवच लढणार आहेत. समाजवादी पक्षाने आतापर्यंत या निवडणुकीत 8 मतदारसंघांमधून 14 वेळा उमेदवार बदलले आहेत. दोन लोकसभा मतदारसंघांमधून प्रत्येक तीनदा उमेदवार बदलण्यात आले आहेत. तेज प्रताप यादव कनौज मतदासंघातील स्पर्धेमध्ये मागे पडत आहेत, असे दिसून आल्यानंतर त्यांना बदलण्यात आले आहे, असेही काही विश्लेषकांचे मत आहे. अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांसमवेत जाऊन अर्ज सादर केला. ते या मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी होतील, अशा विश्वास त्यांचे चुलते राम गोपाल यादव यांनी व्यक्त केला. येथील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारची अनामत रक्कमही जप्त होऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले. तेजप्रताप यादव यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक मैनपुरीमधून जिंकली होती. यंदा त्यांना उमेदवारीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

Advertisement

अखिलेश यादव दोनदा खासदार

अखिलेश यादव यांनी 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कनौजमधून विजय मिळविला होता. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला उत्तर प्रदेशात बहुमत मिळाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने त्यांनी लोकसभा सोडली होती. सध्या ते उत्तर प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. कनौज मतदारसंघात 13 मे या दिवशी मतदान होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.