For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News: अखिल भारतीय किसान सभेचे आजऱ्यात आंदोलन, मागण्यांची अंमलबजावणी करा

12:46 PM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur news  अखिल भारतीय किसान सभेचे आजऱ्यात आंदोलन  मागण्यांची अंमलबजावणी करा
Advertisement

पूर्वीप्रमाणे ही नावे मालकी हक्कात घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली

Advertisement

आजरा : देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांकडे परंपरेने चालत आलेल्या आहेत. या जमीनीला वारसा हक्काने सात-बारा पत्रकी नोंदी घालण्याची मागणी करीत अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आजरा तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले.

काही देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांची मालकी हक्काला 7/12 पत्रकी परंपरागत नावे होती. ती इतर हक्कात घालण्यात आली असून हा प्रकार चुकीच्या पद्धतीने करण्यात आला असल्याचा आरोप या आंदोलनावेळी करण्यात आला. पूर्वीप्रमाणे ही नावे मालकी हक्कात घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Advertisement

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे खंड वेळेत भरून घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. राज्य शासनाने लेखी आश्वासन दिल्याप्रमाणे कायदा करून देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे, देवस्थान इनाम जमिनीच्या अधिकार अभिलेखात (7/12) कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पूर्वीप्रमाणे समाविष्ट करण्यात यावीत.

देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांची वारसा नोंद करण्यात यावी, . नूल तालुका गडहिंग्लज येथील देवस्थान जमीन असणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांची नावे चुकीच्या पद्धतीने, बेकायदेशीरपणे सात-बारा वरून कमी करण्यात आलेली आहेत. ती पूर्ववत समाविष्ट करण्यात यावीत, देवस्थान समितीने आश्वासन दिल्याप्रमाणे नियमावली बनवून सरसकट सर्व खंडकरी शेतकऱ्यांचा खंड भरून घेण्यात यावा.

ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये गोठा, शेतघर, विहीर, बोरवेल मारले असेल त्यांच्याकडून भुई भाडे भरून घेऊन त्यांना नियमित करण्यात यावे. जाचक अटी रद्द करा, सातबारावर नाव नसल्याने या शेतकऱ्यांची ऑनलाइन पीक पाहणी नोंद होत नाही. परिणामी खंड भरून घेतला जात नाही, पिक कर्ज मिळत नाही.

त्यामुळे तत्काळ या शेतकऱ्यांची पिक पहाणी नोंद करून लिखित सातबारा उतारा या शेतकऱ्यांना देण्यात यावा, जिह्यातील अनेक गावांमध्ये स्थानिक उपसमिती व काही ग्रामस्थांच्या माध्यमातून या खंडकरी शेतकऱ्यांना होणारा त्रास तत्काळ थांबवण्यात यावा. देवस्थानची पिकाऊ जमीन क्रीडांगणासाठी, सार्वजनिक हॉल बांधण्यासाठी अथवा स्वत:च्या शेतीला रस्ता जाण्यासाठी इत्यादीसाठी या जमिनीची मागणी करत आहेत.

यासाठी स्थानिक पातळीवर राजकीय सत्तेचा वापर करून देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांवर दबाव आणला जात आहे. त्यामुळे स्थानिक उपसमित्या बरखास्त करण्यात याव्यात, सर्व देवस्थान जमीन धारक शेतकऱ्यांना पी एम किसान योजना व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळावा आदी मागण्या या आंदोलनावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनात सुभाष जाधव, कॉ. संग्राम सावंत, दशरथ दळवी, कॉ. शिवाजी गुरव, हणमंत गुरव, शिवाजी गिलबिले, संजय गुरव, जानबा धडाम, काशिनाथ तेली, सुरेश शिंगटे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :

.