भारताकडून आर्मेनियाला ‘आकाश’ सुरक्षा कवच
संरक्षण निर्यात क्षेत्रात नवी झेप : अझरबैजानसोबत आर्मेनियाचा जुना संघर्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम आशियातील मित्रदेश आर्मेनियाला भारताने पहिली आकाश एअर डिफेन्स बॅटरी पुरविली आहे. याचबरोबर भारताने संरक्षण निर्यात क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची विक्री केल्यावर भारताच्या या हवाई सुरक्षा कवचाची मागणी अन्य देशांकडून वाढली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने पहिली आकाश मिसाइल सिस्टीम बॅटरी मित्रदेशाला निर्यात करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
स्वदेशात विकसित हवाई सुरक्षा प्रणालीची ही पहिली आंतरराष्ट्रीय विक्री आहे. संरक्षण मंत्रालयातील संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार यांनी मिसाइल सिस्टीम बॅटरी आर्मेनियासाठी रवाना केली आहे. भारतातून निर्यात केली जाणारी ही दुसरी क्षेपणास्त्र प्रणाली आहे.
पाकिस्तानला टेन्शन
भारताकडून प्राप्त या हवाई सुरक्षा कवचाचा वापर आर्मेनिया स्वत:चा शेजारी शत्रू देश अझरबैजानसोबतच्या लढाईत करू शकतो. आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात नागोर्नो-काराबाख क्षेत्रावरून जुना वाद आहे. दोन्ही देश या भूभागावरून संघर्ष करत असतात. अझरबैजानला या लढाईकरता पाकिस्तान अन् तुर्कियेकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत राहिला आहे. परंतु आता आकाश क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली प्राप्त झाल्याने आर्मेनियाचे सामर्थ्य वाढले असून तो पाकिस्तानी शस्त्रास्त्रांना क्षणार्धात नष्ट करू शकतो. आर्मेनियाच्या कारवाईत स्वत:ची शस्त्रास्त्रs नष्ट झाली तर जगभरात चेष्टेचा विषय ठरू अशी चिंता आता पाकिस्तानला सतावू लागली आहे.
आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा
डीआरडीओकडून विकसित आकाश क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र असून ते 25 किलोमीटरच्या कक्षेतील लढाऊ विमान, क्रूज क्षेपणास्त्र, ड्रोन आणि अन्य हवाई धोक्यांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. आकाश डिफेन्स सिस्टीमची प्रत्येक बॅटरी 3डी पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ऐरे रडारने सज्ज असून ती शत्रूंचा माग काढण्यास उपयुक्त आहे. यात चार लाँचर असून ज्यातील प्रत्येकामध्ये तीन इंटरलिंक्ड क्षेपणास्त्रs जोडण्यात आली आहेत. ही यंत्रणा वाहनांवर तैनात केली जाऊ शकते. बीईएलने यात देखरेख रडार, मिसाइल गायडेन्स रडार आणि सी4आय सिस्टीम समवेत अनेक महत्त्वपूर्ण ग्राउंड सपोर्ट उपकरणे जोडुन त्याला शक्तिशाली स्वरुप दिले आहे. यात अशा सिस्टीमचा अंतर्भाव करण्यात आला आहे, जी एकाचवेळी अनेक विमाने आणि क्षेपणास्त्रांना ट्रॅक करू शकतात. भारताने यापूर्वी फिलिपाईन्सला ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची निर्यात केली होती.