आकाश क्षेपणास्त्र प्रणालीची युएईला ऑफर
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी मांडला प्रस्ताव : मित्रदेश करणार खरेदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने संयुक्त अरब अमिरातला (युएई) आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्यात झालेल्या बैठकीत मांडण्यात आला. दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला असून यात सैन्याभ्यास, प्रशिक्षण, संरक्षण उत्पादनात सहकार्य, संयुक्त प्रकल्प, संशोधन आणि तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान सामील आहे.
भारतासाठी युएईसोबत मजबूत संबंध अत्यंत आवश्यक आहेत. आगामी काळात आम्ही संरक्षण सहकार्य, संयुक्त उत्पादन आणि विकास, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मिळून काम करण्यास उत्सुक आहोत. भारत आणि युएई दोन्ही देश क्षेत्रात शांतता आणि समृद्धीसाठी काम करण्यास तयार आहेत असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.
जागतिक घडामोडींवर चर्चा
दोन्ही नेत्यांनी जगात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर देखील चर्चा केली आहे. संरक्षण सहकार्यासाठी निर्माण करण्यात आलेली व्यवस्था, सैन्याभ्यास आणि प्रशिक्षण कार्यक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रशिक्षण कार्यक्रमांच्या आदान-प्रदानाला संरक्षण सहकार्याचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा मानण्यात आले आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण प्रणाली समजून घेणे आणि संरक्षण संबंधांना मजबूत करण्यास मदत मिळणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
दोन्ही देशांना होणार लाभ
संरक्षण उद्योगांदरम्यान दृढ सहकार्य आवश्यक असून यामुळे दोन्ही देशांना लाभ होणार आहे. मेक इन इंडिया आणि मेक इन एमिरेट्स यासारख्या योजनांवरही लक्ष देण्यात येणार आहे. भारत आणि युएई हे फ्रान्ससोबत मिळून देखील काम करत आहेत. तिन्ही देशांनी 2022 मध्ये एक त्रिपक्षीय व्यवस्था सुरू केली होती, यात संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. संरक्षण सहकार्य अधिक वाढविण्याची भारत आणि युएईची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या व्हिजननुसार याकरता पावले उचलली जात आहेत.
आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा
आकाश क्षेपणास्त्र आकाशात शत्रूच्या विमानांना नष्ट करण्यास सक्षम ओ. आकाश क्षेपणास्त्र 25 किलोमीटरच्या अंतरापर्यंतच्या शत्रूचे विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्रांचा वेध घेऊ शकते. भारत सरकार आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा, पिनाका मल्टी-लाँच रॉकेट सिस्टीम आणि ब्राह्मांस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांची विक्री मित्रदेशांना करू इच्छिते. भारताने यापूर्वीच फिलिपाईन्सला ब्राह्मोस क्षेपणास्त्रs पुरविली आहेत. तर आर्मेनिया हा देश आकाश, पिनाका आणि 155 एमएम तोफांचा पहिला विदेशी ग्राहक ठरला आहे.
डेझर्ट नाइट : हवाई युद्धाभ्यास
भारत, युएई आणि फ्रान्सने डिसेंबर महिन्यात अरबी समुद्रात डेझर्ट नाइट नावाने हवाई युद्धाभ्यास केला होता. संरक्षण सहकार्य मजबूत करणे आणि सैन्यक्षमता वाढविणे हा यामागील उद्देश होता. जून 2023 मध्ये तिन्ही देशांच्या नौदलांनी सागरी युद्धाभ्यास केला होता. संरक्षण संबंध वृद्धींगत करण्यासाठी भारत आणि युएई अनेक पावले उचलत असल्याचे मागील काही काळात दिसून आले आहे.
आकाश : शत्रूला मारणार, देशाचे रक्षण करणार
आकाश क्षेपणास्त्र हवेत असलेल्या शत्रूला नष्ट करते.
स्वयंचलित यंत्रणा अनेक शत्रूंना एकाचवेळी भेदण्यास सक्षम.
यातील रडार आकाशातील शत्रूचा माग काढण्यास सक्षम
यंत्रणेत चार सेल्फ-प्रोपेल्ड लाँचर देखील असतात, प्रत्येक लाँचरमध्ये तीन क्षेपणास्त्रs असतात.
क्षेपणास्त्रातील सेल्फ-डिस्ट्रिक्टिव्ह डिव्हाइस लक्ष्य भेदण्यास अयशस्वी ठरल्यास स्वत: नष्ट होते.
आकाश इलेक्ट्रॉनिक काउंटर-काउंटरमेजर सिस्टीमचा वापर करते.
यामुळे ही सिस्टीम शत्रूच्या इलेक्ट्रॉनिक हल्ल्यांपासून स्वत:ला वाचवू शकते.
बॅलेस्टिक क्षेपणास्त्र 2 हजार चौकिमीच्या भागाला हवाईहल्ल्यांपासून वाचविते.
आकाश यंत्रणा सहजपणे कुठेही नेता येते, तसेच तैनात करता येते.