आकाश आनंदचा मायावतींसमोर माफीनामा
लखनौ: बहुजन समाज पक्षातून हकालपट्टी झाल्यावर आकाश आनंद यांनी मायावती यांच्या नावाने खुले पत्र लिहिले आहे. हे पत्र ट्विट करत त्याने मी क्षमा मागू इच्छितो असे म्हटले आहे. मी अन्य कुठल्याही पक्षात जाणार नाही. नेहमी बसपसोबचत राहणार आहे. मायावती या माझ्या राजकीय गुरु, प्रेरणा असून राजकारणात जे काही शिकलो, ते त्यांच्या मार्गदर्शनामुळेच असे आकाश आनंद यांनी पत्रात नमूद पेले आहे.
मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियामध्ये अनेक प्रकारच्या अफवा सुरू आहेत. मी अन्य कुठल्याही राजकीय पक्षात सामील होणार नाही. बसप माझ्यासाठी केवळ एक पक्ष नाही तर माझा परिवार आहे. माझे सासरे अशोक सिद्धार्थ यांना पक्षातून हाकलण्याचा मायावती यांचा निर्णय योग्य आहे. मी या निर्णयासोबत उभा आहे. नातेसंबंध आपल्या ठिकाणी आहेत, परंतु मिशन माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. व्यक्तिगत अन् कौटुंबिक हितांपेक्षा पक्ष आणि आंदोलनाचे हित राखणे ही माझी जबाबदारी असल्याचे आकाश यांनी पत्रात म्हटले आहे.
मायावतींच्या नेतृत्वात पक्ष आणि मिशनच्या सेवेची संधी मी पुन्हा इच्छितो. विश्वास शब्दांनी नव्हे तर कामांनी निर्माण होतो आणि मी ते माझे वर्तन आणि मेहनतीद्वारे सिद्ध करणार असल्याचे आकाश आनंदने म्हटले आहे.