आकाश अंबानी जियो प्लॅटफॉर्मचे व्यवस्थापकीय संचालक
वृत्तसंस्था/मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रिजचे डिजिटल क्षेत्रातील कंपनी जियो प्लॅटफॉर्मच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरची नियुक्ती ही पुढील 5 वर्षासाठी असणार असून जियोच्या आयपीओसाठी मे वा जूनमध्ये सेबीकडे अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे. शेअरबाजाराला दिलेल्या माहितीनुसार आकाश अंबानी यांच्याकडे नवी जबाबदारी दिली असून आता आयपीओ सादरीकरण प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे.
बाजारातील तज्ञांनुसार जियो प्लॅटफॉर्म मेच्या अखेर वा जून महिन्यात आपला आयपीओअंतर्गतचा अर्ज दाखल करु शकते. आकाश यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघ आता मजबूत होणार आहे. यांच्या मार्गदर्शनातून गुंतवणूकदारांनाही स्पष्ट दिशा मिळणे शक्य होणार आहे. 2014 मध्ये रिलायन्स जियोच्या संचालक मंडळावर आकाश हे सामील झाले. ते समूहातील डिजिटल आणि टेलिकॉम धोरणात बारकाईने लक्ष घालत आहेत. जून 2022 मध्ये त्यांना रिलायन्स जियो इन्फोकॉमचे चेअरमन बनवण्यात आले. जियो प्लॅटफॉर्मच्या एमडी पदाच्या भूमिकेत ते आता आपली जबाबदारी सांभाळतील.