‘अकासा’चा प्रवास तोट्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विमान कंपनी प्रमुख अकासा एअरचा आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये निव्वळ तोटा 18.7 टक्क्यांनी वाढून सुमारे 1,983 कोटी रुपयांवर पोहोचला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांचा खर्च वाढणे, देखभाल आणि विमानतळ शुल्कात वाढ आणि परकीय चलन खर्चात वाढ झाल्याने हे नुकसान झाले.
आर्थिक वर्ष 2025 मध्ये अकासाचा तोटा वाढला असून इतर तीन प्रमुख विमान कंपन्या जशा की इंडिगो, स्पाइसजेट आणि एअर इंडिया यांनी चांगली कामगिरी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत नफ्यात थोडीशी घट झाली असली तरी इंडिगो नफा कमवत राहिला, तर स्पाइसजेट ही हवाई क्षेत्रातील कंपनी पुन्हा नफ्यात परतली आणि एअर इंडियाने त्याचे नुकसान कमी केले असल्याचीही माहिती आहे.
2025 च्या आर्थिक वर्षाच्या निकालांबद्दल अकासा एअरच्या प्रवक्त्याने सांगितले की, एअरलाइन अनुमानांवर भाष्य करत नाही. परंतु त्यांनी असेही म्हटले की, ‘कोणत्याही विमान कंपनीची सुरुवातीची वर्षे कर्मचारी, ताफा, प्रशिक्षण, ऑपरेशनल पायाभूत सुविधा आणि नेटवर्कमध्ये गुंतवणूक करण्यासाठी समर्पित असतात हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे, या वर्षांत कोणतीही विमान कंपनी नफा कमवू शकत नाही. विमान कंपनी चालवणे हा एक निश्चित खर्चाचा व्यवसाय आहे आणि नफा मिळवण्यापूर्वी व्यवसायाचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे आश्चर्यकारक नाही, असेही स्पष्ट केले आहे.