लवकरच भरारी घेणार ‘अकासा’ एअर
राकेश झुनझुनवाला यांच्या एअरलाइनला डीजीसीएची मंजुरी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिग बुल या नावाने प्रसिद्ध दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याशी संबंधित अकासा एअरला विमानोड्डाण नियामक डीजीसीएकडून गुरुवारी विमानोड्डाणाचा परवाना मिळाला आहे. यामुळे अकासा एअर आता विमानोड्डाणांचे संचालन सुरू करू शकणार आहे.
हा परवाना मिळणे आमच्यासाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. आमची विमानोड्डाणे सुरू करणे आणि वाणिज्यिक संचालन सुरू करण्याची अनुमती यामुळे मिळाली असल्याचे अकासा एअरने म्हटले आहे. एअरलाइन्सने स्वतःच्या चालक दलाच्या सदस्यांच्या युनिफॉर्मचा फर्स्ट लुक देखील जारी केला आहे.
एअरलाइनने 21 जून रोजी भारतात स्वतःचे पहिले बोइंग 737 मॅक्स विमानाची डिलिव्हरी स्वीकारली होती. 72 बोइंग 737 मॅक्स जेटची ऑर्डर करत असल्याचे कंपनीने म्हटले होते. या 72 पैकी 18 विमाने पुढील वर्षापर्यंत कंपनीला मिळणार आहेत. तर उर्वरित 54 विमाने पुढील 4 वर्षांमध्ये मिळत जाणार आहेत. अकासा एअरचा पहिला मार्ग हा देशांतर्गत असणार आहे. प्रारंभिक काळात अकासा एअरची विमानोड्डाणे महानगरांपासून टियर-2 आणि टियर-3 शहरांसाठी होणारआहेत.