कोल्हापुरात पाच ठिकाणी आकांक्षा स्वच्छतागृह
पर्यटकांची सोय करण्याचा उद्देश : अडीच कोटी निधीची तरतूद
कोल्हापूर
महापालिकेने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरातील दसरा चौक, बिंदू चौक, पंचगंगा घाट, रंकाळा आदी ठिकाणी पर्यटकांनासाठी आकांक्षा स्वच्छतागृहाची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. ऐतिहासिक स्थळांना खेटून असलेल्या या कामासाठी जागेची निवड करताना त्या ठिकाणाच्या सौर्द्याला तसेच उपयोगितेला बाधा येणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे.
केंद्र सरकारने देशातील सर्व शहरे आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्व नवीन शौचालयांपैकी एक चतुर्थांश शौचालये ‘आकांक्षापूर्ण‘ असतील, ज्यात आंघोळीचे क्यूबिकल्स आणि स्पर्शरहित फ्लशिंगसारख्या सुविधा असतील. ही स्वच्छतागृहे गुगल मॅप्सवर देखील असतील. या स्वच्छतागृहाचा शहवासीयांसह उपयोग खासकरुन पर्यटकांना झाला पाहिजे.
भारतीय शहरांमध्ये बांधल्या जाण्राया सर्व नवीन सार्वजनिक शौचालयांपैकी एक चतुर्थांश शौचालयांमध्ये आलिशान बाथरुम, स्पर्शरहित फ्लशिंग, स्तनपान कक्ष आणि स्वयंचलित सॅनिटरी नॅपकिन इन्सिनरेटर यांसारख्या उच्च दर्जाच्या सुविधा असाव्यात असे मागर्दशन सुचित नमूद केले आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना सूचना पाठवण्यात आल्या आहेत की, आतापासून कोणत्याही शहरात किंवा शहरी भागात जोडल्या जाण्राया सार्वजनिक शौचालयांमधील २५ जागा ‘आकांक्षी शौचालये‘ असावेत अशी सक्त सुचना दिली आहे.
यापार्श्वभूमीवर शहरात पाच ठिकाणी आकांक्ष शौचालयांची बांधणीचे काम सुरू आहे. बिंदू चौकात पार्कींग ठिकाणी, रंकाळा, अंबाबाई मंदिर परिसरात बांधणी होत आहे. प्रत्येकी पन्नास लाखांप्रमाणे अडीच कोटी रूपये निधीची तरतूद महापालिकेने केली आहे. यामध्ये पाच महिला आणि पाच पुरूष शौचालयं तसेच स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दसरा चौकातील जागा चुकीची
दसरा चौकाला ऐतिहासिक महत्व आहे. दरवर्षी दस्रयाला या ठिकाणी मोठा कार्यक्रम होतो. कोल्हापुरातील शाही दसरा देशात दुस्रया स्थानी आहे. दसरा चौकात अनेक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दसरा चौकातील मैदानावर अगदी सुरूवातीच्या बाजूलाच ही शौचालयांची बांधणी होत आहे. दर्शनी बाजूला शौचालय न बांधता शाहू स्मारकच्या जागेचा काही भाग आणि केएमटी ऑफिसला लागून एका कोप्रयात बांधणीची जागा निवडण्याची मागणी होत आहे.