‘अकाली दल वारिस पंजाब दे’ पक्ष स्थापन
तुरुंगात कैद अमृतपाल सिंह अध्यक्ष नियुक्त
वृत्तसंस्था/ अमृतसर
आसामच्या डिब्रूगढ तुरुंगात कैद खासदार अमृतपाल सिंहच्या पक्षाचे नाव ‘अकाली दल वारिस पंजाब दे’ असणार आहे. माघी मेला पंथक कॉन्फरन्स ‘पंथ बचाओ पंजाब बचाओ’मध्ये याची घोषणा झाली. एनएसए अंतर्गत तुरुंगात अमृतपालला पक्षाचा अध्यक्ष करण्यात आले आहे. अमृतपाल सिंहचे वडिल तरसेम सिंह आणि त्याच्या समर्थकांकडून ही पंथक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.
अमृतपालच्या पक्षाच्या विस्तारासाठी सदस्यत्व अभियान राबविले जाणार आहे. पंथक कॉन्फरन्समध्ये 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून ती पक्षाचे संघटन उभारणे आणि याच्याशी संबंधित अन्य निर्णय घेणार आहे. याचबरोबर सदस्यत्व अभियान अन् पक्षाची घटना तयार करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मुक्तसर येथे पार पडलेल्या पंथक कॉन्फरन्समध्ये 15 प्रस्ताव संमत करण्यात आले. यातून नव्याने स्थापन पक्ष पंजाबच्या पंथक राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करू पाहत असल्याचे स्पष्ट होते.
शिरोमणी अकाली दलाने पंजाबच्या लोकांचे समर्थन गमाविले आहे. नवा पक्ष यामुळे रिक्त झालेली जागा भरून काढणार आहे. तसेच शिख संस्थांना मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. पक्ष राज्यात समाजाच्या सर्व घटकांसाठी सौहार्दपूर्ण अन् व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करत असल्याचे संमत प्रस्तावांमध्ये म्हटले गेले आहे.
अमृतपालला एप्रिल 2023 मध्ये मोगाच्या रोडे गावातून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. त्याच्यावर पोलीस स्थानकात शिरून बॅरिकेड्स तोडणे, तलवार अन् बंदुका उगारण्याचाही आरोप आहे. परंतु 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबच्या एका मतदारसंघातून अमृतपालने अपक्ष म्हणून विजय मिळविला होता.