मोठी बातमी! अजित पवारांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात, अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू
अजित पवारांच्या विमानाचा अपघात
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईमधून बारामतीमध्ये उतरताना अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.बारामतीमध्ये अजित पवार यांची सभा होणार होती. या सभेसाठी जात असतानाच ही मोठी दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
विमानाच्या लँडिंग वेळी हा अपघात झालेला आहे. या अपघाताचे धक्कादायक व्हिडिओही आता समोर येत आहेत. विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचे दिसत आहे.विमान कोसळल्यानंतर विमान जळाल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र अपघात इतका भीषण होता की, त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्या ठिकाणी आता पोलिस आणि इतर कार्यकर्ते देखील पोचलेले आहेत. नेमका हा अपघात कशामुळे झाला आहे आणि कोण जखमी झालेत याची माहिती थोड्यावेळाने बाहेर येईल.