शरद पवार यांच्यावर ईर्ष्या करण्यासाठी सभा नाही, हसन मुश्रीफांचे स्पष्टीकरण
Hasan mushrif News : कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा जाहीर नागरी सत्कार आणि मेळावा घेण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये गेलो.कार्यकर्त्याच्या मनात संभ्रमावस्था राहू नये.कार्यकर्त्यांच्यामध्ये अस्वस्था निर्माण होऊ नये. शरद पवार साहेबांच्या जिथे सभा होतात त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण होऊ नये यासाठी आमच्या सभा आहेत.एवढाच आमचा प्रयत्न आहे. शरद पवार यांच्यावर ईर्ष्या करणे किंवा त्यांना उत्तर देण्यासाठी आमच्या सभा नाहीत आम्ही त्यांचेच कार्यकर्ते आहोत, अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.उद्या कोल्हापुरात तपोवन मैदानात राष्ट्रवादीची उत्तरदायित्व सभा होणार आहे. यापार्श्वभूमीवर शहरात स्वागत कमान,मोठे होर्डिंग आणि सुसज्ज मंडप लावण्यात आला आहे.नुकतीच शरद पवार यांची सभा झाली.त्याला उत्तर म्हणून ही सभा असल्याची चर्चा सध्य़ा सुरु आहे. यावर हसन मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, अजित दादांच्या व्यक्तिमत्त्वावर तरुण फिदा आहेत.दादा जे बोलतात तेच करतात. लोकांच्या पाठिशी राहतात.कोल्हापूर जिल्ह्यातील जे-जे मोठे प्रश्न निकाली लागले ते दादांमुळे निघाले.आताही जे प्रलंबित प्रश्न आहेत ते दादा निकाली काढतील.कोल्हापुरातील प्रलंबित प्रश्न लवकरच निकालात निघतील त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दादांना मदत करतील.कोल्हापुरात होणाऱ्या सभेसाठी राज्यातील नऊ मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष देखील उपस्थित राहणार आहेत.कोणत्याही पक्षप्रवेशासाठी ही सभा नाही.या सभेमध्ये फक्त नागरिक सत्कार आणि विकास कामांवर चर्चा होणार.अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी वेळोवेळी राष्ट्रवादी हा आमचाच पक्ष असल्याचे स्पष्ट केल्याचे मुश्रीफ म्हणाले.