For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Supriya Sule and Ajit Pawar : माऊली पावणार! आषाढी एकादशीपर्यंत ताई-दादा एकत्र येणार?

12:18 PM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
supriya sule and ajit pawar   माऊली पावणार  आषाढी एकादशीपर्यंत ताई दादा एकत्र येणार
Advertisement

येत्या 10 तारखेला पक्षाचा मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याची शक्यता

Advertisement

Ajit Pawar and Supriya Sule : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकत्रिकरणाचे वारे वाहत आहेत. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच एकत्र येतील, अशी शक्यता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.

पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत ताई आणि दादा एकत्र येऊ शकतात, असे वक्तव्य मिटकरींनी केले आहे. त्यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मिटकरींना कानपिचक्या दिल्या आहेत.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावर बोलत असताना म्हटले की, पांडुरंगाची ईच्छा असेल तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात. येत्या 10 तारखेला पक्षाचा मेळावा आहे, तोपर्यंत वाट बघा.

मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याची शक्यताही मिटकरींनी व्यक्त केली. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच एकत्र येतात का, अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, सोमवारी शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एका मंचावर येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्ताने काका-पुतणे एकत्र येणार आहेत.

कोण कुठे जाणार हे पक्ष ठरवेल : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, याबद्दलचा निर्णय काही माझा नाही. कोण कुठे जाणार हे ठरवण्याचा अधिकार पक्षाचा आहे, शरद पवारांचा आहे.

शरद पवारांचे राजकारण सर्वांना माहीत आहे. शरद पवार लोकशाही मार्गाने निर्णय घेत असतात. त्या संदर्भात ते सगळ्यांसोबत चर्चा करतात. कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे, ते मला कळेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मिटकरींना कानपिचक्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर संतप्त झाले. सुनील तटकरे म्हणाले की, राज्यातील जनतेने आमच्या पक्षावर शिक्कामोर्तब केला आहे. आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि आता एनडीएसोबत सरकारमध्ये आहोत. त्यामुळे यामध्ये आता कोणताही बदल होणार नाही.

ज्यांना सोबत यायचे आहे त्यांनी यावे, त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्नच नाही. अमोल मिटकरी यांनी यापुढे बोलताना जपून बोलावं. पक्षातील वरिष्ठांनी एकदा भूमिका मांडली की त्यानंतर इतर कोणी त्याच्यावर बोलण्याची गरज नाही, अशा कानपिचक्या प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मिटकरींना दिल्या.

Advertisement
Tags :

.