Ajit Pawar Kolhapur Tour : कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं, मी दिलं का?, अजित पवारांनी हातच झटकले?
कोल्हापुरातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरलाय
कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आज कोल्हापुरातील चंदगड दौऱ्यावर आहेत. राजेश पाटील या दौऱ्यासाठी आग्रही होते, त्यामुळे हा दौरा केला असं ते म्हणालेत. अजित पवार हे नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. दरम्यान, चंदगडच्या दौऱ्यामध्येही त्यांनी शेतकरी कर्जमाफीविषयी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सध्या राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी शेतकरी नेते यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांना शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर प्रश्न विचारला असता त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिलं आहे का? असा उलट सवाल करत हात झटकले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा स्वत: उपमुख्यमंत्रीच यावर समाधानकारक उत्तर देत नसल्याने हा विषय तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती सरकारने जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अधिक हायलाईट केला होता. आणि आता सरकारचे सर्वच नेते यावर ठोस वक्तव्य करत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
मागील काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन राज्यात ठिकठिकाणी शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. काही ठिकाणी सरकारविरोधात आंदोलने सुरु आहेत. कोल्हापुरातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला आहे. मागील आठवड्यात मंत्री संजय सावेकर यांच्या कोल्हापूर दौरादरम्यान स्वाभिमानी संघटनेने त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत सरकारचा निषेध व्यक्त केला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजू शेट्टी हे कर्जमाफीचा मुद्दा घेवून आक्रमक झाले आहेत यावरील प्रतिक्रिया विचारली असता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिलं आहे का? असाच उलट सवाल केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेच कर्जमाफी मिळणार आहे की हा केवळ निवडणूकीपुरता सत्ताधाऱ्यांचा स्टंट होता अशा चर्चांना उधाण आले आहे.