For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गजापुरातील हिंसाचारग्रस्तांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत; पदाधिकाऱ्यांकडून सलोखा संवाद व आर्थिक सहाय्य

05:00 PM Jul 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
गजापुरातील हिंसाचारग्रस्तांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत  पदाधिकाऱ्यांकडून सलोखा संवाद व आर्थिक सहाय्य
Advertisement

प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गावात जाऊन केला सलोखा संवाद व आर्थिक मदत

गजापूर : प्रतिनिधी

गजापूर ता. शाहूवाडी येथील हिंसाचारग्रस्त कुटुंबीयांना कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संसार उपयोगी साहित्य व आर्थिक मदत करण्यात आली. आमदार राजेश पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गावात जाऊन सलोखा निर्माण व्हावा या भावनेतून ग्रामस्थांशी संवाद साधला आणि मदत केली. पक्षाकडून हिंसाचारग्रस्तांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आली व दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

Advertisement

आमदार राजेश पाटील म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कालच गजापूरसह विशाळगड घटनेमध्ये पीडित झालेल्या सर्वांना भेट दिली आहे. त्यांची विचारपूस केली आहे. त्याचबरोबर प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिलेल्या आहेत. आज आम्ही राष्ट्रवादीच्यावतीने इथल्या हिंसाचारग्रस्त नागरिकांना मदत केली आहे. पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफही गावाला लवकरच भेट देणार आहेत.

यावेळी बोलताना केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, या सगळ्या प्रकारामध्ये पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांना जाणीवपूर्वक टार्गेट केल जात आहे. रविवारी दि. १४ रोजी ज्यादिवशी ही दुर्दैवी घटना घडली त्या दिवशी आम्ही पहाटे पाच वाजताच कागलवरून निघून वेळापूर ति. माळशिरस येथे पंढरपूर दिंडीच्या तिसऱ्या रिंगण सोहळ्यासाठी दिंडीमध्ये पोहोचलो होतो. हा दिंडीतील हा रिंगण सोहळा पूर्ण करून पालकमंत्री मुश्रीफसाहेब गाडीत बसल्यानंतर त्यांना कोल्हापुरातून फोन यायला सुरुवात झाली. त्यादिवशी आम्हीही सोबत होतो. त्या क्षणापासूनच श्री. मुश्रीफसाहेब अस्वस्थ होत गेले. त्यावेळी एक तर फोनला रेंज नव्हती. तसेच; तिथून पुढे दुपारी बारामतीला महासन्मान रॅलीचा मेळावाही होता. त्या क्षणाला तर तिकडून परत येऊन विशाळगडला जाणे शक्य नव्हते किंवा तशा वातावरणात तिथे जाणेही योग्य नव्हते. या दुर्दैवी घटनेमुळे दिवसभर चाललेली त्यांच्या जीवाची घालमेल आम्ही जवळून बघितली आहे. बारामतीमध्ये व्यासपीठावरसुद्धा ते सुन्न बसून होते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे भाषण सुरू असताना सगळे प्रमुख मान्यवर उठून पुढे आले. परंतु; श्री. मुश्रीफसाहेब पुढे आले नाहीत. फोनवरून ते कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात होते. आता काहीजण असा सवाल करतील की, मग दुसऱ्या दिवशी मंत्री मुश्रीफ तिकडे का गेले नाहीत? कारण; त्या घटनेमुळे तिथे संचारबंदी लागू केली होती. संचारबंदी लागू असताना पालकमंत्र्यांनी तिथे जाणे हे दिसायलाही बरोबर दिसणारे नव्हती.

Advertisement

त्यांना येणे गरजेचेच होते...!
आता कोणी म्हणेल काँग्रेसचे लोक एवढ्या लवकर तिथे कसे पोहोचले? त्यांना ते येणं गरजेचं होतं. कारण; वडिल आणि मुलगा अशा एकाच घरात दोन वेगवेगळ्या भूमिका निर्माण झालेल्या होत्या.

यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील- कुरुकलीकर, पैलवान रवींद्र पाटील, आर व्ही पाटील, अमित गाताडे, असिफ फरास आदिल फरास मनोजभाऊ फराकटे, शिरीष देसाई, नितीन दिंडे, सतीश घाडगे, संजय चितारी आदी प्रमुख उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.