Ajit Pawar Kolhapur Tour : अजित पवारांचा फेटा बांधण्यास नकार, सभेत NCP च्या नेत्याला अश्रु अनावर
कुठे माशी शिंकली कळाले नाही आणि दुर्दैवानं पराभव झाला, पाटलांनी व्यक्त केली खंत
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका दौऱ्यावर आहेत. चंदगड मतदार संघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेश पाटील यांच्या आग्रहा खातर त्यांनी मतदार संघाला भेट दिली आहे. अजित पवार चंदगडमध्ये येणार असल्याने राष्ट्रवादीकडून सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील यांना बोलताना अचानक अश्रू अनावर झाले. त्यामुळे काही काळ सभेत शांतता पसरली. उपमुख्यमंत्री यांनी सभेत कोल्हापूरी फेटा बांधून घेण्यास नकार दिल्याने राजेश पाटील यांना सभेत बोलताना हुंदका आवरला नाही.
राजेश पाटील म्हणाले, 'दादा तुम्ही माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर नाराज आहात. तुम्ही आज फेटा सुद्धा बांधून घेतला नाही. तुम्ही फेटा स्विकारला नाही ही खंत मनामध्ये राहील. परंतु तुम्हाला शब्द देतो की, 2019 ला एका राजेश पाटलाचा पराभव झाला आहे. मतदार संघाची पुनर्रचना जर झाली तर या मतदारसंघातून दोन आमदार निवडून दिल्याशिवाय पक्षाचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिपत्याखाली उत्तम कामगिरी करुन दाखवायची आहे. तरच आपण मतदार संघासाठी काहीतरी द्या असं म्हणू शकतो.
पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या माध्यमातून या मतदार संघात 1600 कोटीची कामं झाली आहेत. आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांसाठी योगदान दिलं मात्र त्यामानाने यश संपादन करता आले नाही. माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचले आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या नेत्याच्या माध्यमातून त्यांना पुन्हा उभारी मिळेल. तुम्ही कानउघाडणी केली तर आणखी जोमाने काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तुम्ही कोरोनाकाळतही मतदार संघासाठी योगदान दिलेत. काजू प्रोसेसिंग, साखर कारखाने, दूध उत्पादनाला उभारी दिली. मात्र कुठे माशी शिंकली कळाले नाही आणि दुर्दैवानं माझा पराभव झाला. परंतु आजही ना उमेद न होता कार्यकर्ते पुन्हा एकदा नव्या जोमाने उभे राहत आहेत.