... अन् खूश होऊन 'त्यांनी' DCM अजित पवारांना थेट सातारी कंदी पेढाच भरवला!
रेशन दुकानदारांचे कमिशनवाढ केल्याने अनोखे स्वागत; 4 महिने थकलेले कमिशनही देणार
सातारा : रेशन दुकानदारांचे अनेक प्रश्न अनेक समस्या आहेत. त्यांच्या समस्या सुटाव्यात म्हणून रेशन दुकानदार संघटना महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा यांच्यावतीने पाठपुरावा सुरु असून त्यामधील रेशनवरील कमिशनला मंजुरी दिली गेली आहे. त्याबद्दल रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने सातारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना पेढा भरवला. व्यासपीठावर जाऊन पेढा अजित पवारांना देत आनंद व्यक्त केला.
त्याबाबत माहिती देताना श्रीकांत शेटे म्हणाले, गेल्या ७ वर्षा पासून रेशन दुकानदारांना कमिशन वाढ करण्याबाबतचा विषय प्रलंबित होता. या संदर्भात ४ दिवसापूर्वी मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात दोन्ही राज्य संघटनेचे राज्याध्यक्ष पदाधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडली.
त्या बैठकीत मंत्र्यांनी प्रती १ क्विंटल धान्य वाटपासाठी दुकानदारांना कमिशन म्हणून २० रुपये इतकी वाढ देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. निदान कमिशन वाढीची ही एक चांगली सुरवात झाली आहे. भविष्यात कमिशनमध्ये अजूनही वाढ होऊ शकते. या सकारात्मक सुरवातीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपोडे बु (ता. कोरेगांव) येथे सातारा जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत समक्ष जाऊन रेशन दुकानदारांच्यावतीने अभिनंदन पत्र पुस्तक, सातारी कंदी पेढे, गुलाब पुष्प देऊन सम्मानित करण्यात आले.
तसेच गेल्या ४ महिन्यांपासून दुकानदारांना कमिशन मिळाले नाही. ते त्वरीत मिळावे, ही मागणी करण्यात आली. या मागणीस अजितदादांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच प्रलंबित कमिशन मिळेल, असे आश्वासित केले. असे शेटे यांनी सांगितले.
यावेळी मारुती किदंत, हेमंत विगुणे संदीप भणगे, पदाधिकारी, दुकानदार उपस्थित होते.