अजितदादांची क्रेज कालपण आणि आजपण...!
राजकारण्यांसह विविध संस्था पदाधिकाऱ्यांची भेटण्यास मांदियाळी
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची क्रेझ काल आणि आजपण कायम असल्याचे सोमवारी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या तुफान गर्दीवरुन दिसून आले. उपमुख्यमंत्री पवार यांना भेटण्यासाठी, राजकीय आणि प्रशासकीय कामानिमित्ताने भेटण्यास आलेल्यांची मांदियाळी दिसली. सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांसह विविध संस्था पदाधिकाऱ्यांना वेळ देऊन त्यांची गाऱ्हाणी ऐकली. दिवसभरातील व्यस्त कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांच्याभोवती सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना गोतावळा दिसून आला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर यापूर्वी दोन वेळा अजित पवार कोल्हापुरात आले होते. मात्र त्यावेळी त्यांची भेट निव्वळ राजकीय होती. राजकारणात बदलेल्या संदर्भाने त्यावेळचा दौरा होता. आताचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा शासकीय आणि राजकीय कार्यक्रमांनी भरगच्च असा होता. उपमुख्यमंत्री पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार रविवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापुरात आले. सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नेत्यांशी त्यांनी संवाद साधला. जिह्यातील राजकीय घडामोडींची माहिती घेतली. पुढील महिन्यात अर्थसंकल्प जाहीर होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी जिह्यासाठी निधी तसेच विकासकामांची माहिती पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्याचे कळते.
गंगावेश तालीम मंडळ येथे भेट देऊन नुतनीकरणासाठी भरघोस निधीची घोषणा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकासकामे तथा योजनांचा जिल्हास्तरीय आढावा घेतला. भीमा कृषी प्रदर्शनास भेट दिली. दुपारी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्पास भेट देऊन गोकुळ दूध संघाच्या हिरक महोत्सवी वर्ष समारंभास उपस्थिती दर्शवली. त्यानंतर कणेरी मठ येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे राज्यस्तरीय महाअधिवेशनास संबोधित केले. सायंकाळी कागल येथील विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच शेतकरी मेळावा झाला. सत्तांतरानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी जिह्यत प्रथमच भरगच्च अशा राजकीय, सामाजिक उपक्रमांत सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री पवार यांच्या भोवती दिवसभर कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करत एकप्रकारे उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचे यातून प्रकर्षाने दिसून आले.