Ajit Dowal | अजित डोवाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर
त. भा. प्रतिनिधी, पुणे
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (लोकमान्य टिळक स्वराज्य संघ) वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला असल्याची घोषणा टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 106 वी पुण्यतिथी आहे.
त्यादिवशी दुपारी बारा वाजता मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या सोहळ्यात ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’चे वितरण होणार आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल.
या वेळी टिमविच्या कुलगुरू व टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, टिमवि ट्रस्टच्या उपाध्यक्ष आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक, विश्वस्त रामचंद्र नामजोशी, विश्वस्त सरिता साठे उपस्थित राहतील. त्याचबरोबर उद्योग, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
1983 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिल्या वषी एस. एम. जोशी या पुरस्काराचे मानकरी ठरले होते. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, इंदिरा गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, नितीन गडकरी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथानू पिल्लई, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पूनावाला, सुधा मूर्ती यांच्यासह अन्य दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.