अजिंक्यतारा’चे कार्य दिशादर्शक
सातारा :
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने प्रगतीचा आलेख कायम चढता ठेवून आदर्शवत कामकाज सुरू ठेवले आहे. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असलेला हा सहकारी साखर कारखाना राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय सहकार विभागाचे संचालक डी. के. वर्मा आणि नॅशनल फेडरेशन ऑफ को-
ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी काढले.
डी. के. वर्मा व प्रकाश नाईकनवरे यांनी अजिंक्यतारा कारखान्यास सदिच्छा भेट देऊन कारखान्याच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या दोघांचे स्वागत केले. यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव सावंत, व्हाइस चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वर्मा म्हणाले, केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याच्या धोरणास प्रोत्साहन देणेसाठी सहकारी साखर कारखान्यांना प्राधान्य देण्याचे धोरण ठरविलेले आहे. तसेच मक्यापासून इथेनॉल निर्मितीसही प्रोत्साहन देण्याचे धोरण आखलेले आहे. देशात सुमारे 300 लाख मेट्रिक टन मक्याचे उत्पादन होते. वर्षातून दोन पिके घेता येतात व कमी पाण्यामध्ये पीक तयार होते. साखर कारखान्यांनी हंगामामध्ये सिरप, बी हेवी व सी हेवीपासून इथेनॉल निर्मिती करावी आणि बिगर हंगामामध्ये मक्यापासून इथेनॉल निर्मिती करावी. यामुळे डिस्टिलरी प्लँटचा वापर वाढेल आणि त्यातून साखर कारखान्यांना आर्थिक फायदाही होईल, असे ते म्हणाले.
नाईकनवरे म्हणाले, जुलै 2021मध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू केलेले असून तेव्हापासून सहकारी संस्थांना विशेष प्राधान्य मिळत आहे. साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जादा दिलेला ऊसदर हा कारखान्यांचे उत्पन्न गृहित धरून त्यावर इनकम टॅक्स भरण्याच्या नोटीसा होत्या. स्वतंत्र सहकार मंत्रालय झाल्यामुळे साखर कारखान्यांचे आयकराचे मोठे संकट दूर झालेले आहे.
- सहकारातून सहकाराचा विकास-वर्मा
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने बंद असलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्वावर चालविण्यास घेऊन तोही यशस्वीपणे सुरू केल्याबद्दल डी. के. वर्मा यांनी आनंद व्यक्त केला. सहकारातून सहकाराचा विकास केल्याबद्दल मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे त्यांनी अभिनंदन केले.