अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व
इराणी करंडकासाठी संघाची घोषणा : शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, सरफराज खानचा समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने विदर्भाचा पराभव करून रणजी करंडक 2024 चे विजेतेपद पटकावले होते. आता मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात इराणी चषक सामना होणार आहे. हा सामना लखनौमध्ये दि. 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने बुधवारी आपला संपूर्ण संघ जाहीर केला. मुंबईच्या नेतृत्वाची धुरा अनुभवी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली असून श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, सरफराज खान यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
इराणी करंडकासाठी मंगळवारी सरफराज खानसह तिघांना भारतीय संघातून रिलिज करण्यात आले होते. आता, सरफराज मुंबई संघाचा सदस्य असणार आहे. याशिवाय, सरफराजचा भाऊ मुशीर खानचीही संघात वर्णी लागली आहे. दीर्घ कालावधीपासून संघाबाहेर असलेला श्रेयस अय्यर आता मुंबई संघातून खेळणार आहे तर शार्दुल ठाकुरच्या समावेशामुळे मुंबईची ताकद वाढली असल्याचे दिसून येत आहे. गेले काही महिने शार्दुल घोट्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. आता, तो पूर्णपणे तंदुरुस्त इराणी ट्रॉफीत शानदार कामगिरी करत टीम इंडियात पुनरागमन करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. याशिवाय, कर्णधार अजिंक्य रहाणे व श्रेयस अय्यर हे दोन अनुभवी खेळाडूही आपली छाप उमटवण्यासाठी प्रयत्नशी असतील.
मुंबई संघ - मुंबई संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, सरफराज खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तोमोर, सिद्धांत अधातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनैद खान, रॉयस्टन डायस.