अनुभवामुळे ‘केकेआर’चे नेतृत्व अजिंक्य रहाणेच्या हाती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कोलकाता नाइट रायडर्सचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी विक्रमी रक्कम देऊन करारबद्ध करण्यात आलेल्या वेंकटेश अय्यरला पसंती न देता अजिंक्य रहाणेला संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यामागील कारण उघड केले असून त्याचा अनुभव यासाठी विचारात घेतला गेला असे स्पष्ट केले आहे. कर्णधारपदाच्या घोषणेपूर्वी रहाणे आणि अय्यर यांची नावे कर्णधारपदासाठी आघाडीवर राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. मध्यप्रदेशचा अष्टपैलू खेळाडू ‘रिटेन्शन’च्या यादीत नव्हता आणि तो मेगा लिलावात झळकला. केकेआरला त्याला परत आणण्यासाठी तब्बल 23.75 कोटी ऊ. खर्च करावे लागले. केकेआरमध्ये परतल्यानंतर अय्यरने जर आपल्यावर जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला गेला, तर आपल्याला कर्णधारपदात रस असल्याचे कबूल केले होते.
तथापि, तीन वेळच्या विजेत्या केकेआरने अनुभवी रहाणेच्या बाजूने जाण्याचा आणि अय्यरला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. ‘आयपीएल ही एक खडतर स्पर्धा आहे. कर्णधारपद़ तरुण व्यंकटेश अय्यरवर खूप बोजा टाकेल. आम्ही असे बरेच खेळाडू पाहिले आहेत ज्यांना पुढे कर्णधारपद हाताळताना खूप आव्हानांचा सामना करावा लागलेला आहे. कर्णधारपदासाठी स्थिरता, भरपूर अनुभव व परिपक्वता लागते. आमच्या मते, या साऱ्या गोष्टी रहाणेमध्ये आहेत, असे म्हैसूर यांनी म्हटले आहे. रहाणे आगामी आयपीएलमधून केकेआरसमवेतच्या त्याच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुऊवात करेल. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट आणि राजस्थान रॉयल्स अशा दोन संघांचे 25 सामन्यांमध्ये नेतृत्व केलेले आहे.