अजिंक्य रहाणे केकेआरचा नवा कर्णधार
वेंकटेश अय्यरकडे व्हाईस कॅप्टनची धुरा : केकेआर संघव्यवस्थापनाची माहिती
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) आयपीएलच्या 18 व्या हंगामासाठी अजिंक्य रहाणेला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. मेगा लिलावात 23.75 कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या व्यंकटेश अय्यरला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. केकेआर संघाचे सीईओ वेंकी मैसून यांनी याबाबतची माहिती दिली. 2024 च्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ चॅम्पियन बनला होता, यावेळी त्याला पंजाब किंग्जने लिलावात खरेदी केले. केकेआर यंदाच्या हंगामाची सुरुवात आरसीबीविरुद्ध लढतीने करणार आहे. 22 मार्चला कोलकाता येथे ईडन गार्डन्स मैदानावर हा मुकाबला होईल.
अजिंक्य रहाणे केकेआरचा 9 वा कर्णधार असेल. त्याच्या आधी सौरव गांगुली, ब्रेंडन मेकॉलम, गौतम गंभीर, जॅक कॅलिस, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, श्रेयस अय्यर आणि नितीश राणा यांनीही संघाचे नेतृत्व केले आहे. मागील 8 कर्णधारांपैकी फक्त 2 खेळाडूंना संघासाठी ट्रॉफी जिंकता आली. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली संघाने 2012 आणि 2014 मध्ये विजेतेपद जिंकले. तर श्रेयस अय्यरने 2024 मध्ये संघाला विजेतेपद मिळवून दिले. रहाणे गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीने त्याला सोडले. महिनाभरापूर्वी झालेल्या लिलावात सुरुवातीच्या टप्प्यात अजिंक्य रहाणे अनसोल्ड गेला होता. दहापैकी एकाही संघाने त्याला संघात घेण्यात स्वारस्य दाखवले नाही. मेगा लिलावात केकेआरने त्याला 1.50 कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर खरेदी केले. रहाणेने आतापर्यंत 185 आयपीएल सामन्यांमध्ये 30.14 च्या सरासरीने 4642 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 2 शतके आणि 30 अर्धशतके आहेत.
वेंकटेश अय्यर महागडा खेळाडू
आयपीएल लिलावात कोलकाता संघाने अष्टपैलू वेंकटेश अय्यरसाठी तब्बल 23.75 कोटींची बोली लावली. अनेक संघ वेंकटेशला ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी आतूर होते पण कोलकाताने प्रचंड पैसे खर्चून वेंकटेशला पुन्हा संघात सामील केलं. वेंकटेशसाठी कोलकाताचा निर्धार पाहता तो भावी कर्णधार असू शकतो असं संकेत मिळत होते. पण केकेआर संघव्यवस्थापनाने सगळ्यांना धक्का देत रहाणेला कर्णधारपदी नेमण्याचा निर्णय घेतला. अर्थात, सध्याच्या घडीला वेंकटेश हा संघातील सर्वात महागडा खेळाडू आहे.
प्रतिक्रिया
आयपीएलमधील यशस्वी फ्रँचायझीपैकी एक असलेल्या केकेआर संघाचे नेतृत्व करणे ही सन्मानाची गोष्ट आहे. आमच्याकडे उत्तम व संतुलित संघ आहे. यंदाही आम्ही जेतेपद मिळवण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरु, हा विश्वास आहे.
अजिंक्य रहाणे, केकेआरचा कर्णधार