अजय भल्ला यांच्याकडे नागालँडचाही कार्यभार
राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी सोमवारी नागालँडचे 22 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. राज्यपाल ला गणेशन यांच्या निधनानंतर त्यांना हा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. शपथविधी समारंभ कोहिमा येथील राजभवन येथे पार पडला. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आशुतोष कुमार यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो, उपमुख्यमंत्री टी. आर. झेलियांग आणि वाय. पॅटन, राज्यमंत्री, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर शपथविधी समारंभाला उपस्थित होते. शपथविधी समारंभात भल्ला यांनी मुख्यमंत्री रियो आणि राज्य मंत्रिमंडळाची भेट घेतली. समारंभाचा भाग म्हणून त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ही देण्यात आला.
शपथविधीनंतर राजभवन येथे स्वागत समारंभ झाला. याप्रसंगी राजकीय नेते, आदिवासी संघटना, चर्च प्रतिनिधी आणि नागरी समाजाच्या सदस्यांनी नवीन राज्यपालांचे स्वागत केले. हा प्रसंग नागालँडच्या राजकीय आणि सामाजिक एकतेचे प्रतीक बनल्याचे दिसून आले. तथापि, पाच प्रमुख जमातींचे प्रतिनिधी समारंभाला अनुपस्थित होते. आरक्षण धोरण पुनरावलोकन समितीचे सदस्य असलेल्या आओ, अंगामी, लोथा, रेंगमा आणि सुमी जमातींच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. ते चार दशके जुन्या आरक्षण धोरणात सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. या जमातींनी स्वातंत्र्यदिनाच्या समारंभावरही बहिष्कार टाकला होता.