Ajara Crime : मडिलगेच्या 'त्या' ग्रामपंचायत सदस्याने का केली पत्नीची हत्या? कारण आले समोर...
दरोड्याचा बनाव करीत पतीनेच पत्नीचा खून केल्याचे उघड झाले
आजरा : दरोडेखोरांनी पत्नी पूजा हिचा खून करून दागिने व रोकड लंपास केल्याची फिर्याद मडिलगे ग्रामपंचायतीचे सदस्य सुशांत गुरव यांनी रविवारी पोलिसात दिली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी 24 तासांच्या आत छडा लावला असून दरोड्याचा बनाव करीत पती सुशांत यानेच पत्नीचा खून केला असल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सुशांत याला अटक केली आहे. आजरा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मडिलगे येथील गुरव गल्लीत सुशांत गुरव याच्या घरी दरोडा टाकून दरोडेखोरांनी पत्नी पूजा हिचा खून केला. तसेच घरातील 10 तोळे दागिने आणि 90 हजारांची रोकड लंपास केल्याची फिर्याद सुशांत याने रविवारी पोलिसांत दिली होती.
मात्र सुशांत देत असलेली माहिती यामध्ये विसंगती असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी तपास सुरू केला. घटनास्थळी श्वानपथक, न्यायवैद्यक तज्ज्ञांना बोलाविण्यात आले. त्यांच्या माध्यमातून प्रथमदर्शनी पुरावे जमा करण्यात आले. यासाठी ६ तपास पथके तयार करण्यात आली. संशयित सुशांत याने काही लोकांकडून व बँकेतून कर्ज घेतलेली आहेत.
तो कर्जबाजारी असल्यामुळे ती परत करण्यासाठी पत्नी पूजा हिच्याकडे सोन्याचे दागिने गहाण ठेवून पैसे काढण्यासाठी पाठी लागला होता. यातून लोकांची देणी व बँकेचे कर्ज भागवूया तसेच आपल्याला असलेल्या आजारावर औषधोपचार करुया असे म्हणत होता. या कारणावरून शनिवारी मध्यरात्री सुशांत व पूजा या दोघांमध्ये वादावादी झाली.
यापूर्वी देखील तुमच्या आजोबांच्या आजारपणावेळी सोने गहाण ठेवले होते. आता मी सोने देणार नाही. तुम्ही काय करायचे ते करा असे पूजा त्याला म्हणाली. त्यामुळे सुशांत याने रागाच्या भरात घरातच असलेल्या दगडाने व छोट्या फावड्याने तिच्या डोक्यात मारहाण केली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. त्यामुळे दरोड्याचा बनाव करुन पत्नी पूजाचा खून केल्याची कबुली सुशांतने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, आजरा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नागेश यमगर, उपनिरीक्षक संजय पाटील, युवराज धोंडे व स्थानिक गुन्हे शाखेकडील उपनिरीक्षक शेष मोरे, संजय गळवे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
फिर्यादीच निघाला आरोपी
या प्रकरणाचा तपास करीत असताना फिर्यादी हा खून व दरोडा पडला आहे असे भासवण्याचा प्रयत्न करीत होता. फिर्यादी याचा बनाव हा तपास पथकाच्या निदर्शनास आला. तपास पथकाने फिर्यादीकडून गुन्ह्याचे प्रात्यक्षिक करुन घेत असताना त्याने दिलेला जबाब व प्रात्यक्षिक यामध्ये विसंगती असल्याचे आढळून आले.
त्यामुळे पोलिसांचा फिर्यादीवरील संशय बळावला. घटनास्थळावरील परिस्थिती, पुरावे, गोपनीय माहिती तसेच फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडे अत्यंत कौशल्यपूर्वक तपास करीत असताना हा गुन्हा सुशांत गुरव यानेच केला असून फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.