For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Aajara News: आजरा तालुका संघाची शेती सेवा केंद्र सुरु करणार, 66 वी वार्षिक सभा खेळीमेळीची

05:58 PM Sep 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
aajara news  आजरा तालुका संघाची शेती सेवा केंद्र सुरु करणार  66 वी वार्षिक सभा खेळीमेळीची
Advertisement

संघाच्या 66 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते

Advertisement

आजरा : आजरा तालुका शेतकरी संघाच्या शेतकरी छाप मिश्र खताला चांगली मागणी आहे. आगामी काळात शेजारील गडहिंग्लज, चंदगड तसेच भुदरगड तालुक्यात खत विक्री करून संघाची प्रगती साधण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना बियाणे, औषधे वेळेत व वाजवी दरात उपलब्ध करण्यासाठी लवकरच गवसे, उत्तूर व मलिग्रे आदी ठिकाणी शेती सेवा केंद्रे सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे, असे चेअरमन महादेव पाटील यांनी सांगितले.

संघाच्या 66 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सभेत मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. व्हाईस चेअरमन दौलतराव पाटील यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. चेअरमन पाटील म्हणाले, पश्चिम भागातील शेतकऱ्यांना खत वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी यावर्षीपासून गवसे येथे खत निर्मिती केंद्र सुरू केले.

Advertisement

त्याचा लाभ त्या भागातील शेतकऱ्यांना झाला. खत विक्रीतूनच संघाला प्रगतीपथावर न्यायचे असून सभासद, शेतकऱ्यांनी यापुढेही संघाला सहकार्य करावे, ऊसाबरोबरच शेतकऱ्यांना केशर आंबा आणि पेरू पिकांचे उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. अहवाल वर्षात संघाला 1 कोटी 20 लाख 77 हजारांचा व्यापारी नफा झाला आहे.

8 लाख 42 हजार 500 रूपयांचा निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. व्यवस्थापक जनार्दन बामणे यांनी नोटीस वाचन केले. यावेळी तानाजी देसाई यांनी ताळेबंदात झालेली घसरण संस्थेसाठी योग्य नाही. यावर तातडेने उपाययोजना करा, अशी सूचना केली. यावेळी सचिन पावले, संजय देसाई, धनाजी किल्लेदार यांच्यासह सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन पाटील, संचालक सुधीर देसाई यांनी उत्तरे दिली.

सभेला कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई, व्हाईस चेअरमन सुभाष देसाई, माजी चेअरमन वसंतराव धुरे, संचालक रचना होलम, कारखान्याचे संचालक अनिल फडके, मारूती घोरपडे, काशिनाथ तेली, रणजित देसाई, माजी उपसभापती शिरिष देसाई, दिपक देसाई, युवक राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर, अंकुश पाटील, रामचंद्र पाटील, देवदास बोलके, एस. एस. बिद्रे उपस्थित होते. संचालक संभाजी तांबेकर यांनी आभार मानले.

आजऱ्यातील हत्तींना ‘वनतारा’मध्ये पाठवा

आजरा तालुक्यात दोन हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. रोजच्या नुकसानीला शेतकरी वैतागला आहे. शासनाने पुढाकार घेऊन हे दोन्ही हत्ती अंबानी यांच्या वनतारा“मध्ये नेऊन सोडावेत, असा ठराव जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी मांडला.

अभिनंदनाचे ठराव

सभेत मनोज जरांगे-पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव तानाजी देसाई यांनी मांडला. गवसे येथे खत निर्मिती केंद्र सुरू केल्याबद्दल देवदास बोलके यांनी संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

Advertisement
Tags :

.