एअरटेल डेटा सेंटर, क्लाउडसह वित्तीय सेवांवर लक्ष केंद्रीत करणार
एअरटेलचे प्रमुख सुनील मित्तल यांची भविष्यासाठी नवी तरतूद
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार सेवा प्रदाता कंपनी, भारती एअरटेल, आपल्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी डेटा सेंटर, क्लाउड आणि वित्तीय सेवांवर लक्ष केंद्रित करणार आहे. कंपनीचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे.
गेल्या दशकात डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीत 3.3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर, मित्तल म्हणाले की, एअरटेलची गुंतवणूक एका मजबूत आणि सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधांच्या आधारावर असेल. ‘गेल्या काही वर्षांमध्ये, आम्ही एअरटेलसाठी विकासाचे नवीन इंजिन तयार करण्यासाठी एक सुनियोजित धोरण अवलंबले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीमध्ये एअरटेल मनी लिमिटेडला नॉन-डिपॉझिट टेकिंग नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणून काम करण्यास मान्यता दिली. मित्तल यांनी याला भारतातील आर्थिक समावेशनाची व्याप्ती वाढवण्याच्या व्यापक उद्दिष्टासाठी एक महत्त्वाचा टप्पा म्हटले. त्याच महिन्यात, कंपनीने पुढील काही वर्षांत एअरटेल मनीमध्ये 20,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती, ज्यापैकी 70 टक्के गुंतवणूक एअरटेलकडून आणि उर्वरित गुंतवणूक मूळ कंपनी भारती एंटरप्रायझेसकडून केली जाईल.
एअरटेल क्लाउड, तिसरे विकासाचे इंजिन : मित्तल
सुनील मित्तल म्हणाले, की, ‘एअरटेल क्लाउड, आमचे तिसरे विकासाचे इंजिन, याला सुरुवातीच्या टप्प्यातच उत्साहवर्धक मागणी मिळत आहे. आमच्या सार्वभौम, टेलको-ग्रेड क्लाउड सेवा भारतीय बाजारपेठेच्या बदलत्या गरजा पूर्ण करतात. एअरटेल क्लाउडमुळे आमच्या ग्राहकांना भारतात होस्ट केलेल्या आणि देखरेख केलेल्या जागतिक दर्जाच्या क्लाउड सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतात.’