For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीरियात इराणच्या दूतावासानजीक एअरस्ट्राइक

06:47 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीरियात इराणच्या दूतावासानजीक एअरस्ट्राइक
Advertisement

इस्रायलकडून कारवाई : इराणचे अनेक कमांडर ठार

Advertisement

वृत्तसंस्था/ दमास्कस

इस्रायल-हमास युद्धादरम्यान सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये एअरस्ट्राइक झाला आहे. हा हल्ला इराणच्या दूतावासानजीक झाला असून यात 7 जण मारले गेले आहेत. इस्रायलने स्वत:च्या एफ-35 लढाऊ विमानांद्वारे एअरस्ट्राइक केल्याचा दावा इराणने केला आहे.

Advertisement

इराणच्या कुर्द्स फोर्सचे 2 टॉप कमांडर आणि 5 अन्य अधिकारी या हल्ल्यात मारले गेले आहेत. सीरियात इराणचे सर्वात वरिष्ठ अधिकारी मोहम्मद रेजा जाहेदी आणि त्यांचे डेप्युटी कमांडर मोहम्मद हज रहीमी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. एअरस्ट्राइकमध्ये सीरियातील इराणचे राजदुत हौसेन अकबरी बचावले आहेत. आमच्याकडे या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे प्रत्युत्तर कधी आणि कसे द्यावे याचा निर्णय आम्ही घेणार आहोत असे इराणच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

इराणी कमांडर जाहेदी हा गाझामधील युद्धावरून पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादच्या नेत्यांसोबत बैठक करत असताना हा एअरस्ट्राइक झाल्याचे समजते. इराणच्या दूतावासाने या हल्ल्याची निंदा केली आहे. इस्रायलचा हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायदे, मुत्सद्देगिरीचे नियम आणि व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करणारा आहे. इस्रायलने पहिल्यांदाच आमच्या दूतावासाच्या अधिकृत इमारतीवर हल्ला केला आहे. आम्ही येथे इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचा ध्वज फडकवितो, आम्ही याप्रकरणी निश्चित प्रत्युत्तर देऊ असे इराणचे राजदूत होसैन अकबरी यांनी म्हटले आहे. 2011 मध्ये सीरियात गृहयुद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने तेथे शेकडो हवाई हल्ले केले आहेत.

Advertisement
Tags :

.