जर्मनीत कर्मचारी संपामुळे विमानसेवा कोलमडली
3,400 उ•ाणे रद्द : 5 लाख प्रवाशांना फटका ; 25 लाख कामगारांकडून पगारवाढीची मागणी
वृत्तसंस्था/ बर्लिन
जर्मनीतील सर्व विमानतळांच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी करत एक दिवसाचा संप पुकारल्यामुळे सोमवारी देशभरातील हवाई वाहतूक सेवा कोलमडली होती. या संपामुळे देशभरातील 13 प्रमुख विमानतळांवरील 3,400 उ•ाणे रद्द करण्यात आली. यात फ्रँकफर्ट आणि म्युनिकसारख्या प्रमुख विमानतळांचा समावेश असून या संपाचा 5 लाखांहून अधिक प्रवाशांना फटका बसला आहे.
देशात 25 लाख सरकारी कर्मचारी असलेल्या युनियनने पगारवाढीच्या मागणीसाठी संप पुकारला होता. या संपात सार्वजनिक विभागाचे कर्मचारी, ग्राउंड स्टाफ आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे बहुतेक सर्व जर्मन विमानतळांवर विमानांची वाहतूक कोलमडली होती. कामगार संघटनेने विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी 8 टक्के पगारवाढ किंवा दरमहा किमान 34,000 रुपये (350 युरो) पगारवाढ करण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कामगार संघटना कर्मचाऱ्यांसाठी नवीन करारावर वाटाघाटी करत होती. या कराराअंतर्गत कॉर्पोरेट कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्था सुधाराव्यात, अधिक रजा द्याव्यात, वार्षिक बोनस 50 टक्क्यांनी वाढवावा आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित व अनिवार्य वैद्यकीय चाचण्यांसाठी डॉक्टर निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे अशा मागण्या केल्या आहेत.