विमान प्रवाशांच्या संख्येचा 5 लाखाचा विक्रम
ऑक्टोबरमध्येही संख्या वाढतीच : इंडिगोला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद
मुंबई :
नोव्हेंबरमध्ये विक्रमी स्वरूपात विमान प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जवळपास पाच लाख लोकांनी एकाच दिवसात विमानाचा प्रवास केला आहे. हवाई मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्यांदा विमान प्रवाशांची संख्या एका दिवसात म्हणजे रविवारी पाच लाखापेक्षा अधिक पोहचली आहे. गेल्या रविवारी एकाच दिवसात हा विक्रम रचला गेला होता. रविवारी 5 लाख 5 हजार 414 प्रवाशांनी विमानाचा प्रवास केला होता. भारतातील हवाई क्षेत्र हे सध्याला वेगाने विकसित होत असून प्रवासासाठी विमानांची पुरेशी उपलब्धता त्याचप्रमाणे उत्तम सेवा यामुळे विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
अनेक कारणे
विमानतळांचे आधुनिकीकरण हे देखील विमान प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढण्याचे आणखी एक कारण सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विमान प्रवासासंबंधी आवश्यक ती माहिती ग्राहकांना मिळत असल्याने या सेवेचा उपयोग ते जास्तीत जास्त करत आहेत. गेल्या एक दशकामध्ये देशातील विमानतळांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे. परिणामी प्रवाशांना अपेक्षित शहराला विमानाने जाणे सहज शक्य होत आहे.
ऑक्टोबरमध्ये 1 कोटीहून अधिक जणांचा प्रवास
याच दरम्यान ऑक्टोबरमध्ये 1 कोटी 36 लाख प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये विमानतळांची संख्या 5.3 टक्के इतकी वाढली आहे. यामध्ये इंडिगो एअरलाइन्स यांनी सर्वाधिक 63 टक्के इतकी हिस्सेदारी काबीज केली आहे.
इंडिगोने नेले 86 लाख प्रवाशांना
मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये 1 कोटी 26 लाख प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. इंडिगो विमानाने जवळपास 86 लाख प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. यानंतर टाटा समूहाची एअर इंडिया आणि विस्तारा यांच्या विमानातून अनुक्रमे 26 लाख, 12 लाख लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती समोर येते आहे.