पूर्व लडाखमध्ये एलएसीपासून 35 किमी अंतरावर एअरफील्ड
3 किमी लांब धावपट्टीचे 95 टक्के काम पूर्ण : प्रोजेक्ट हिमांकसाठी उणे तापमानातही काम सुरू
► वृत्तसंस्था/ लेह
पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक (एलएसी) चीनसोबत 5 वर्षांपासून सुरू असलेला तणाव आता दूर होऊ लागला आहे. परंतु यादरम्यान भारताने त्या दुर्गम क्षेत्रात अनेक महत्त्वाचे प्रकल्प जवळपास पूर्ण केले आहेत. याचपैकी एक आहे देशातील सर्वाधिक उंचीवर असलेले एअरफील्ड, जे सध्या पूर्व लडाखच्या न्योमा भागातील मुद गावात 13,700 फूटांवर आकार घेत आहे.
या एअरफील्डसाठी 3 किलोमीटर लांब धावपट्टीचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. एटीसीचे काम पूर्ण होताच पुढील वर्षी एअरफील्ड सैन्यासाठी उपलब्ध होणार आहे. प्रोजेक्ट हिमांक अंतर्गत सैन्याच्या बॉर्डर रोड्स टास्क फोर्स टीम उणे 4 अंश तापमानातही काम कर तआहे. बीआरटीएफ कमांडर कर्नल पोनुंग डोमिंग यांच्यानुसार हा देशातील सर्वात उंच विमानतळ असेल, जो प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून केवळ 35 किलोमीटर तर लडाखपासून 200 किलोमीटर अंतरावर असेल.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये या एअरफील्डच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. केसीसी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडकडून याचे काम केले जात आहे. याकरता 218 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्या 25 कामगार उणे तापमानातही तेथे काम करत आहेत.
पुढील वर्षापासून येथे सर्व प्रकारची संरक्षण विमाने सहजपणे उतरू शकणार आहेत. सध्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अवजड संरक्षण उपकरणे पोहोचवायची असल्यास प्रथम त्यांना 200 किलोमीटर अंतरावर लेह येथील केबीआर विमानतळावर न्यावे लागते. मग तेथून रस्तेमार्गाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक आणले जाते. नवे एअरफील्ड निर्माण झाल्यावर केवळ दोन तासात अवजड शस्त्रसामग्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पोहोचणार आहेत.
लडाखच्या या भागात हिवाळ्यात तापमान उणे 35 अंशापर्यंत खालावते तरीही येथील काम आम्ही थांबविले नाही असे कर्नल डोमिंग यांनी सांगितले. कर्नल डोमिंग या अरुणाचलच्या पहिल्या महिला सैन्य अधिकारी आहेत, ज्यांची कर्नल रँकवर पदोन्नती झाली आहे.
जिवंत प्रोजेक्ट
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या निर्जन भागात पुन्हा वस्ती व्हावी म्हणून जिवंत प्रोजेक्ट अंतर्गत मुद गावाची निवड करण्यात आली. सरकारने याला जिवंत गाव कार्यक्रम नाव दिले आहे. मुदमध्ये धावपट्टीच्या परिसरात आता दुकाने थाटू लागली आहेत. हिवाळ्यात चंदीगडहून ताज्या भाज्यांचा पुरवठा होऊ लागले अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे.