एअरबस, टाटा समूह करणार हेलिकॉप्टर निर्मिती
वृत्तसंस्था/ मुंबई
एअर बस आणि टाटा समूह एकत्रितपणे भारतात हेलिकॉप्टरची निर्मिती करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. टाटा समूहाची सहकारी कंपनी अॅडव्हान्स सिस्टिम्स लिमिटेड यांनी एअरबस हेलिकॉप्टरसोबत संयुक्त करार केला आहे. याअंतर्गत नवा कारखाना स्थापला जाणार असून तेथे हेलिकॉप्टरची निर्मिती करणार असल्याचे सांगितले जात आहे.
एअरबस हेलिकॉप्टर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये कंपनी आगामी काळात हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना स्थापन करणार आहे. यासाठी टाटा समूहासोबत भागीदारी करण्यात आली आहे. या अंतर्गत एच 125 हेलिकॉप्टरची निर्मिती केली जाणार आहे. या हेलिकॉप्टरची निर्यात शेजारच्या देशांनाही केली जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
भारत-फ्रान्स यांच्यात करार
आत्मनिर्भर भारत या सरकारच्या प्रोत्साहनात्मक कार्याला बळ देण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी एकत्रित येऊन संयुक्त करार केला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युल मॅक्रॉन हे अतिथि म्हणून यंदा प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी भारत दौऱ्यावर आले असता यादरम्यान सदरचा वरील करार झाल्याची माहिती आहे. भारत आणि फ्रान्स यांनी मैत्रीअंतर्गत हेलिकॉप्टर निर्मितीसाठी करार केला आहे. या नव्या कारखान्यांतर्गत भारतामध्ये सुट्या भागांची जोडणी, हायड्रोलिक सर्किट रचना, उ•ाण व्यवस्था, इंधन प्रणाली व इंजिन एकीकरणाचे कार्य केले जाणार आहे.
मेड इन इंडिया हेलिकॉप्टर
मेड इन इंडिया अंतर्गत एच 125 हेलिकॉप्टरचा पुरवठा 2026 पासून सुरू होणार असल्याचे समजते. सदरचा कारखाना पूर्णपणे तयार होण्यासाठी 24 महिन्यांचा कालावधी लागू शकतो असेही म्हटले जात आहे.