इस्रायलकडून सीरियात हवाई हल्ला
3 सीरियन सैनिकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
वृत्तसंस्था /दमास्कस
सीरियाची राजधानी दमास्कसनजीक इस्रायलने हवाई हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यांमध्ये सीरियाच्या 3 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. इस्रायलने सीरियन गोलनच्या दिशेने हवाई हल्ला केला असल्याचे सांगण्यात आले.
इस्रायलच्या अनेक क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्यात आल्याचा दावा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. तर सीरिया युद्धात मानवाधिकारांच्या उल्लंघनावर नजर ठेवणारी संस्था सीरियन ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने सैनिकांसोबत तीन नागरिक मारले गेल्याची पुष्टी दिली आहे. तर 10 नागरिक या हल्ल्यांमध्ये जखमी झाले आहेत.
इस्रायलने वायुदलाचे गुप्तचर तळ, उच्च अधिकाऱयांची कार्यालये आणि मेजेह सैन्य वायुतळानजीक एका कारला लक्ष्य केले आहे. तसेच इस्रायलने इराणच्या शस्त्रास्त्र भांडाराला नष्ट केल्याचे सांगण्यात आले. मागील महिन्यात दमास्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला करत इस्रायलने अनेक आठवडय़ांसाठी सीरियाच्या मुख्य विमानतळावरील सेवा बंद ठेवणे भाग पाडले होते.
11 वर्षांपासून सीरियात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलने शेकडो हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांद्वारे सीरियन सैन्य आणि इराणचे समर्थन प्राप्त हिजबुल्लाहच्या सदस्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. इस्रायल स्वतःचा शत्रू इराणला शेजारच्या सीरियात प्रभाव निर्माण करण्यापासून रोखू पाहत आहे. इस्रायलच्या सैन्याने इराणला रोखण्यासाठीच हे हल्ले केल्याचे सांगितले आहे.
इराणने अनेकदा जाहीरपणे इस्रायलचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून संपविण्याची धमकी दिली आहे. इराणचा आण्विक कार्यक्रम हा इस्रायलसाठी मोठय़ा चिंतेचा विषय आहे.