For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायलवर एअर स्ट्राईक, अमेरिकेला धमकी

06:15 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्रायलवर एअर स्ट्राईक  अमेरिकेला धमकी
Advertisement

185 ड्रोन, 110 बॅलिस्टिकसह 36 क्रूझ मिसाईल डागली :  इराणच्या हल्ल्यामुळे जगभरात दहशत

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव, तेहरान

इराणने शनिवारी रात्री उशिरा इस्रायलवर थेट हल्ला करत 300 हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी बहुतेकांना रोखण्यात आले. सीरियाची राजधानी दमास्कस येथील इराणच्या दुतावासावर इस्रायलने केलेल्या कथित हवाई हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला. इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे हा हल्ला रोखला असला तरी इराणच्या या हल्ल्यानंतर पाश्चात्य देश संतप्त झाले आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीसह संयुक्त राष्ट्रानेही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

Advertisement

सीरियातील इराणच्या तळांवर इस्रायलने हवाई हल्ला केल्यापासून पश्चिम आशियामध्ये काहीतरी मोठे घडण्याची भीती होती. आता ही शंका खरी ठरली आहे. इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला करत पहिला झटका दिला आहे. मात्र, इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केवळ एका लष्करी तळाचे किरकोळ नुकसान झाल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात एक मुलगी जखमी झाल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, इराणने 185 ड्रोनद्वारे इस्रायलवर हल्ला करण्याबरोबरच तेहरानमधून जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी 110 क्षेपणास्त्रेही डागण्यात आली. त्याशिवाय क्रूझ मिसाईल डागल्याचीही चर्चा आहे.

इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे इस्रायलचा भूभाग उद्ध्वस्त झाल्याची छायाचित्रे काही माध्यमांवर दाखविली जात आहेत. तसेच काही व्हिडीओही व्हायरल झाले असून त्यात हल्ला सुरू असल्याचे दिसत आहे. बहुतांश क्षेपणास्त्रे आणि ड्रोन इराणकडून डागण्यात आली. तर काही क्षेपणास्त्रे इराक आणि येमेनमधूनही डागण्यात आली. इराणच्या हल्ल्याची माहिती मिळताच पाश्चात्य देश इस्रायलच्या संरक्षणासाठी पुढे आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही प्रतिक्रिया दिली असून इराणने डागलेली जवळपास सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन निष्प्रभ करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

कुणकुण लागताच भारताची सावधगिरी

भारताचे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत तेल अवीव आणि तेहरान यांच्यातील लष्करी संघर्षावर भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारताने हा संघर्ष त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांनी हिंसाचार आणि संघर्षाचा मार्ग सोडून मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून आपल्या समस्यांवर तोडगा काढावा, अशी विनंती भारताने केली. युद्धमय घडामोडींमुळे या भागातील शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे भारताने म्हटले आहे. या हल्ल्याची कुणकुण लागताच भारताने आधीच सावधगिरीच्या उपाययोजना राबविल्या आहेत. प्रवासी विमानांच्या हवाई मार्गात बदल करण्याबरोबरच भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे.

इराणने अमेरिकेला दिला इशाराफोटो : अली खमेनेई

इराणने शनिवारी रात्री इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले. याचदरम्यान इराणने अमेरिकेला हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईचे समर्थन केले तर आम्ही अमेरिकन तळांनाही लक्ष्य करू, असे इराणने म्हटले आहे. यावर अमेरिकेची प्रतिक्रियाही आली आहे. आम्हाला इराणशी युद्ध नको आहे, परंतु वेळप्रसंगी कोणत्याही परिस्थितीत इस्रायलचे संरक्षण करण्यासाठी सतर्क राहू, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन म्हणाले.

Advertisement

.