बेळगावमधील विमानप्रवासी संख्या 13 टक्क्यांनी घसरली
विमानफेऱ्या बंद झाल्याचा परिणाम : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, सात महिन्यांत 30 हजार प्रवाशांची घट
बेळगाव : बेळगाव विमानतळातून दिल्या जाणाऱ्या अनेक विमानसेवा बंद करण्यात आल्याने याचा परिणाम प्रवासी संख्येवर झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 13.08 टक्के प्रवासी संख्या घटल्याचे दिसून येत आहे. विमानांची संख्या वाढवली गेली नाहीतर बेळगाव विमानतळाची परिस्थिती पूर्वीप्रमाणेच होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कर्नाटकात बेंगळूर व मंगळूर ही दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. त्याबरोबरच हुबळी, बेळगाव, शिमोगा, कलबुर्गी व म्हैसूर ही देशांतर्गत प्रवासाची विमानतळे आहेत. राज्यातील मंगळूर, हुबळी, शिमोगा या विमानतळांचा आलेख चढता असताना बेळगाव, म्हैसूर व कलबुर्गी या विमानतळांचा आलेख उतरता आहे. महानगरांपाठोपाठ टू टायर व थ्री टायर शहरांची विमानसेवा रुंदावत आहे. मंगळूर येथील आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत असे दोन्ही प्रवास करणाऱ्या विमानतळावर जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत 14.37 लाख प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. तर हुबळी येथून 2.12 लाख व शिमोगा येथून 94 हजार 291 प्रवाशांनी विमानप्रवास केल्याची नोंद आहे.
मागील वर्षी मंगळूर विमानतळावरून 12.64 लाख, हुबळी येथून 1.80 तर शिमोगा येथून 47 हजार 494 प्रवाशांनी प्रवास केला होता. राज्यात सर्वाधिक शिमोगा विमानतळावरील प्रवासीसंख्या वाढली आहे. त्यापाठोपाठ हुबळी विमानतळाचे 17 टक्क्यांनी प्रवासी वाढले आहेत. बेळगावमधील लोकप्रतिनिधींकडून विमानतळावरील सेवांबाबत योग्य प्रमाणात पाठपुरावा न झाल्यामुळे विमानांची संख्या कमी झाली. यापूर्वी बेळगावमधून चेन्नई, पुणे, तिरुपती, कडाप्पा, नागपूर, नाशिक, म्हैसूर यासह इतर शहरांच्या सेवा बंद करण्यात आल्याने याचा फटका विमानतळाला बसला. मागील वर्षी सात महिन्यात 2 लाख 10 हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. तर यावर्षी केवळ 1 लाख 81 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. तब्बल 30 हजार प्रवासी केवळ सात महिन्यात कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याचा परिणाम बेळगावच्या व्यवसायासह उद्योगधंद्यांवर होत आहे.