एअर इंडियाची आणखी 100 विमानांची ऑर्डर
एकंदर ऑर्डर 570 विमानांची : सेवा विस्तारावर भर
नवी दिल्ली :
एअर इंडियाने व्यवसाय विस्ताराच्या अनुषंगाने नुकतीच नव्याने 100 विमानांची ऑर्डर नोंद केली आहे. या पद्धतीने पाहता आता ऑर्डरचा विचार करता एअर इंडियाकडे एकंदर विमानांची संख्या 570 वर पोहोचणार आहे.
याआधी कंपनीने एकंदर 470 इतक्या विमानांची ऑर्डर नोंदवली आहे. आधुनिकीकरणाबरोबरच विमान सेवा विस्ताराची कंपनीने योजना आखलेली आहे. यामध्ये 10 ए-350 आणि 90 ए-320 या विमानांचा समावेश असणार आहे. आता एकंदर 250 एअर बस आणि 220 बोईंग विमानांचा देखील समावेश आहे. 570 पैकी कंपनीच्या ताफ्यामध्ये 350 एअरबस विमानांचा समावेश आहे. जानेवारी 2022 मध्ये टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण केले होते.
काय म्हणाले चेअरमन
इतर देशांच्या तुलनेत पाहता भारतात हवाई प्रवाशांची संख्या वाढताना दिसते आहे. विविध मार्गावरील सेवांना मागणी असल्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारतात पायाभूत सुविधांची नव्याने पडणारी भर विदेशी पर्यटकांना आकर्षणाचा विषय ठरत आहे. विदेशी पर्यटकांची संख्या ओघानेच भारतात वाढते आहे. नव्या देशांना विमानसेवा जास्तीत जास्त देण्यावर भर पुढील काळात कंपनीचा असणार आहे, असे टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.