एअर इंडियाकडून ‘बेसिक’भाडे श्रेणी सुरु
मोफत जेवण मिळणार नाही, चहा-कॉफी मोफत मिळणार : देशांतर्गत मार्गांवर राहणार बदल
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
एअर इंडियाने निवडक देशांतर्गत मार्गांवर एक नवीन ‘बेसिक’ भाडे श्रेणी सुरू केली आहे. ज्याअंतर्गत प्रवाशांना कमी किमतीत प्रवास करण्याचा पर्याय मिळेल. इकॉनॉमी क्लासच्या तिकिटांमध्ये मोफत जेवणाचा समावेश नसेल, तथापि प्रवाशांना मोफत चहा किंवा कॉफी दिली जाईल. एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, कमी बजेटमध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लक्षात घेऊन हे भाडे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे.
सामानासाठी 15 किलोची मर्यादा
एअर इंडियाच्या नवीन ‘बेसिक’ भाडे श्रेणीची निवड करणाऱ्या प्रवाशांसाठी सामानाचे नियमही निश्चित करण्यात आले आहेत. या श्रेणीअंतर्गत प्रवास करणारे प्रवासी 15 किलोपर्यंतचे चेक-इन सामान घेऊन जाऊ शकतील. याव्यतिरिक्त, त्यांना विमानात 7 किलोपर्यंत केबिन बॅगेज सोबत नेण्याची परवानगी असेल.
आवडीचे जेवण 24 तास आधी बुक करता येईल
जरी या बेसिक फेअरमध्ये मोफत जेवणाचा समावेश नसला तरी, प्रवाशांना जेवण विकत घेण्याचा पर्याय असेल. बेसिक फेअर बुक करणारे प्रवासी विमान सुटण्याच्या 24 तास आधीपर्यंत त्यांचे जेवण आगाऊ खरेदी करू शकतात.
प्रवाशांना शाकाहारी, मांसाहारी, जैन आणि मधुमेहींसाठीच्या जेवणाचे पर्यायही दिले जातील.
विमानाचे वेळापत्रक बदलल्यास परतावा किंवा हस्तांतरणाची सुविधा
एअर इंडियाने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन जेवणाचा परतावा आणि हस्तांतरणासंबंधीचे नियमही स्पष्ट केले आहेत. एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, जर विमानाच्या वेळापत्रकात काही बदल झाला आणि प्रवाशाला दुसऱ्या विमानात स्थानांतरित केले गेले, तर प्रवाशाने खरेदी केलेले जेवण नवीन विमानात हस्तांतरित केले जाईल. जर कोणत्याही परिस्थितीत जेवण उपलब्ध नसेल, तर प्रवाशाला त्याचे पैसे परत केले जातील.