एअर इंडिया कर्मचाऱ्यांना जल्लोष भोवला
चौघांना राजीनामा देण्याचे निर्देश : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतरचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एअर इंडियाने त्यांच्या ग्राउंड हँडलिंग व्हेंचर एअर इंडिया ‘एसएटीएस’च्या चार कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यांच्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अहमदाबाद विमान अपघाताच्या 8 दिवसांनी या कर्मचाऱ्यांनी ही पार्टी केली होती. हा व्हिडिओ गुरुग्राममध्ये आयोजित केलेल्या पार्टीचा असून तो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला होता. एअर इंडियाच्या एआय-171 विमान अपघाताच्या काही दिवसांनी ही घटना घडली होती. दरम्यान, सदर कर्मचाऱ्यांनी जल्लोष नेमका कोणत्या कारणास्तव केला यासंबंधीचा तपास आणि चौकशी केली जात आहे.
‘अहमदाबाद विमान अपघाताच्या दु:खद घटनेने बाधित झालेल्या कुटुंबांसोबत आम्ही पूर्ण सहानुभूती बाळगतो. व्हायरल व्हिडिओमधील कर्मचाऱ्यांचे वर्तन आमच्या कंपनीच्या धोरणाविरुद्ध आहे. आम्ही जबाबदार असलेल्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.’ असे एअर इंडियाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. 12 जून 2025 रोजी झालेल्या या अपघातात 270 जणांना आपला जीव गमवावा लागल्यामुळे संपूर्ण देश शोकाकुल झाला होता. फ्लाइट एआय-171 हे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान होते. ते लंडनला जात होते. उ•ाण घेतल्यानंतर लगेचच ते अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजजवळील एका हॉस्टेलला धडकले. अपघातावेळी विमानात 242 जण होते. त्यापैकी केवळ एकच ब्रिटिश नागरिक बचावला होता.
व्हायरल व्हिडिओने संताप
व्हिडिओमध्ये ‘एसएटीएस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्राहम झकारिया आणि काही कर्मचारी मोठ्या आवाजात गाण्यावर नाचताना दिसत आहेत. ही पार्टी अशावेळी झाली जेव्हा देश एका मोठ्या हवाई अपघाताशी झुंजत होता. त्यामुळे लोकांनी याला असंवेदनशील आणि चुकीचे म्हटले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी असे सेलिब्रेशन करायला नको होते. तसेच एअर इंडियाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. यादरम्यान, एअरलाइनलाही ट्रोल करण्यात आले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरील लोकांनी या कर्मचाऱ्यांचा निषेध केला होता.
यापूर्वी तीन अधिकाऱ्यांना दणका
21 जून रोजी डीजीसीएने एअर इंडियाला 3 अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले. यामध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, क्रू शेड्युलिंग करणाऱ्या मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंग प्लॅनिंगमध्ये सहभागी असलेल्या पायल अरोरा यांचा समावेश होता. विमान वाहतूक सुरक्षा प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल या तिन्ही अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. डीजीसीएने सदर अधिकाऱ्यांना क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित भूमिकांमधून तात्काळ काढून टाकण्याचे आदेश एअर इंडियाला दिले होते.