फिलिपाईन्समध्ये वायुदलाच्या विमानांची हवेतच टक्कर
चारही वैमानिकांचा मृत्यू : प्रशिक्षणादरम्यान दुर्घटना
वृत्तसंस्था/ बटांगस
फिलिपाईन्समध्ये हवाई प्रशिक्षणादरम्यान वायुदलाच्या दोन विमानांची टक्कर झाल्याची दुर्घटना घडली असून त्यात चार वैमानिकांचा मृत्यू झाला. बटांगस प्रांतातील फर्नांडो हवाई तळावर प्रशिक्षण उ•ाणादरम्यान हा भीषण अपघात झाला. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, दोन्ही विमाने हवेत एकमेकांवर आदळली आणि हवाई तळाच्या आवारातच कोसळली. सुदैवाने चार वैमानिकांव्यतिरिक्त इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही विमाने पूर्णपणे निकामी झाली आहेत.
विमान दुर्घटनेची घटना शनिवारी स्थानिक वेळेनुसार अंदाजे दुपारी 3:51 वाजता घडली. दोन्ही विमाने फर्नांडो एअर बेसच्या परिसरात कोसळली. फिलिपाईन्स एअर फोर्सने चार वैमानिकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करतानाच अपघाताचे कारण आणि परिस्थिती निश्चित करण्यासाठी तपास सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट केले. अपघाताच्या कारणांचा तपास पूर्ण होईपर्यंत फिलिपाईन्स वायुदलाने आपली सर्व एसएफ-260 प्रशिक्षण विमाने जमिनीवर थांबवली आहेत. यापूर्वी मे महिन्यात उत्तर फिलिपाईन्सच्या डोंगराळ प्रदेशात आणखी एक एसएफ-260 प्रशिक्षण विमान कोसळल्याने दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता.
फिलिपाईन्स एअर फोर्सने मृत्यूची पुष्टी केली आणि अपघातानंतर तातडीने उचलल्या जात असलेल्या पावलांची माहिती दिली. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. तूर्तास मृत वैमानिकांविषयीची ओळख आणि माहिती उघड करण्यात आलेली नाही.
....................
