बिहारमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले
पूरग्रस्तांना मदत साहित्य वाटपावेळी दुर्घटना : जीवितहानी टळली
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील औरई येथे बुधवारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात कोसळले. याप्रसंगी हेलिकॉप्टरमध्ये 3 सैनिक आणि 2 पायलट होते. सदर पाचही जण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर सीतामढी येथून पूरग्रस्तांसाठीची मदत सामग्री घेऊन जात होते. हवाई दलाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हेलिकॉप्टरचे ब्लेड तुटल्यानंतर पायलटने अत्यंत सावधगिरीने त्याचे पुराच्या संथ पाण्यात लँडिंग केल्याचे सांगण्यात आले. भारतीय वायुसेनेनेही बिहारमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती दिली आहे.
नेपाळमधील मुसळधार पावसामुळे बिहारमधील अनेक नद्यांना पूर आला आहे. 16 जिल्ह्यातील सुमारे 10 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. पूर्णिया, सहरसा, सुपौल, दरभंगा येथे परिस्थिती अत्यंत वाईट आहे. याचदरम्यान बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात हवाई दलाचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. ते कोसळल्यानंतर स्थानिकांनी त्यातील जवानांना सुखरूप बाहेर काढले.
कोसीसह अनेक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्यानंतर बिहारमधील अनेक जिल्ह्यांना सध्या भीषण पुराचा सामना करावा लागत आहे. पुराच्या काळात सरकारकडून मदतकार्य सुरू आहे. बिहारमध्ये आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. भारताशेजारील देश नेपाळमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे बिहारमधील नद्यांना पूर आला आहे. कोसी, गंडक आणि बागमती नद्यांनी उग्र रूप धारण केले आहे. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या बिहारच्या भागात लोकांच्या जीवाला अधिक धोका आहे.