हवाई दल, लष्कर प्रमुखांचे ‘तेजस’मधून एकत्र उड्डाण
वृत्तसंस्था/ बेंगळूर
बेंगळूरमध्ये रविवारी संरक्षण दलांमधील एकता आणि स्वावलंबनाला पाठिंबा देण्याचे दृश्य दिसून आले. भारतीय हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी बेंगळूर येथील येलहंका हवाई दल तळावर एलसीए तेजस लढाऊ विमानातून एकत्रित उड्डाण केले. ‘तेजस’ ही विमानाची फास्टर ट्रेनर आवृत्ती होती.
बेंगळूरमध्ये इंडिया एअर शो सुरू होण्याच्या एक दिवस आधी रविवारी संरक्षण दलातच्या दोन्ही प्रमुखांनी एलसीए तेजस लढाऊ विमानातून एकत्र उड्डाण केले. संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते, हे उड्डाण देशाच्या संरक्षण दलांकडून स्वदेशी आणि भारतात बनवलेल्या शस्त्र प्रणालींना पाठिंबा दर्शविण्यासाठी होते. उड्डाणासाठी वापरलेले एलसीए तेजस विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने बनवले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने विकसित केलेल्या स्वदेशी बनावटीच्या विमानाची ही प्रशिक्षण आवृत्ती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नोव्हेंबर 2023 मध्ये विमानाने उड्डाण केले होते. भारतीय हवाई दलाने यापैकी सुमारे 40 विमाने आधीच समाविष्ट केली आहेत. सरकार नजीकच्या भविष्यात आणखी 83 एलसीए मार्क 1ए समाविष्ट करण्याची योजना आखत आहे. अमेरिकन इंजिन निर्माता कंपनी जीईच्या पुरवठा साखळीतील समस्यांमुळे या विमानांच्या डिलिव्हरीला काही महिने विलंब झाला आहे. भारतीय हवाई दल 83 विमानांनंतर आणखी 97 विमाने समाविष्ट करण्याची योजना आखत आहे.