जनावरांच्या औषधांसाठी वातानुकूलित गोदाम
50 लाखांचा निधी मंजूर : पशुसंगोपनच्या आवारात भूमिपूजन
बेळगाव : जनावरांना लागणाऱ्या औषधांचा साठा करण्यासाठी सुसज्ज वातानुकूलित गोदाम उभारले जाणार आहे. या गोदामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सोमवारी उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या हस्ते झाला. या गोदामामुळे आता जिल्ह्यातील सर्व जनावरांना आवश्यक आणि दर्जेदार औषधे उपलब्ध होणार आहेत. यासाठी 50 लाखांचा निधी खर्ची घातला जाणार आहे. जिल्ह्यात लहान-मोठी 28 लाखांहून अधिक जनावरे आहेत. मात्र या जनावरांना औषध साठा करण्यासाठी गोदाम नव्हते. त्यामुळे पशुसंगोपन खात्यासमोर अडचणी निर्माण होत होत्या. काहीवेळेला औषधे खराब होत होती.
दरम्यान, पशुसंगोपनने वातानुकूलित गोदामाची मागणी केली होती. त्यानुसार आमदार राजू सेठ यांनी 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून सुसज्ज असे वातानुकूलित गोदाम उभारले जाणार आहे. त्यामुळे औषधे ठेवण्यासाठी लागणाऱ्या गोदामाची चिंता आता मिटणार आहे. अलिकडे जनावरांना लम्पी, लाळ्या व इतर संसर्जन्य रोगांची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे प्रतिबंधक लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात साठा करावा लागत आहे. अशा स्थितीत हे वातानुकूलित गोदाम उपयुक्त ठरणार आहे. औषधे व लसीकरणाचा दर्जा टिकून राहण्यासाठी गोदाम महत्त्वाचे आहे. त्यानुसार पशुसंगोपनच्या आवारात गोदाम उभारले जाणार आहे.
लसीकरणाची औषधे ठेवण्यास उपयुक्त
वातानुकूलित परिस्थितीत औषधे ठेवण्यासाठी गोदाम उभारले जाणार आहे. यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. औषधे आणि वेगवेगळ्या लसीकरणाची औषधे यामध्ये ठेवली जाणार आहेत.
- डॉ. आनंद पाटील (तालुका मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी)