UP Vidhansabha Election "उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टी, बीएसपीशी युती करायला तयार ;पण माझ्या या अटी" ओवैसींची विधानसभा निवडणूकीसाठी संकेत
उत्तरप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी विरोधकांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. एएमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा अससुद्दीन ओवैसी यांनी विरोधी आघाडीला काही अटी ठेवल्या असून भाजपला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी कुणाशीही युती करण्याची तयारी दर्शवली आहे. पाहूया सविस्तर वृत्त.
असदुद्दीन ओवैसींना आदराची अपेक्षा.
उत्तर प्रदेशात २०२७ च्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राज्यात आपल्या प्रचाराला आधीच सुरुवात केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, नाव न घेता समाजवादी पक्ष (एसपी) आणि बसपा यांना उघडपणे युतीसाठी तयार असल्याचे संकेत ओवैसी यांनी दिले आहेत.
प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले की, उत्तर प्रदेशात भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आमचा पक्ष आघाडी करण्यास तयार आहे... पण अट ही आहे की, त्या आघाडीत आम्हाला आदराने वागवले जावे आणि समान दर्जा दिला जावा.
ओवैसी म्हणतात ते दिवस गेले
ओवैसी बोलताना म्हणाले की, " आमचा पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी तयार आहे आम्ही पूर्ण ताकदीनिशी आणि तयारीने निवडणुका लढवत आहोत."
'आमच्या पक्षाचे लोक खूप मेहनत करत आहेत आणि आमचे प्रयत्न अविरत सुरू आहेत.'मात्र, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम मतदारांचे बहुमत असल्याच्या दाव्याबद्दल जेव्हा ओवैसींना विचारण्यात आले, तेव्हा ते दिवस आता संपले आहेत असे म्हणत त्यांनी तो दावा सरळ फेटाळून लावला.
एआयएमआयएम इतरांसाठी पायघड्या अंथरणार नाही.
उत्तर प्रदेशातील एका सभेत त्यांनी आघाडीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, "भाजपला रोखण्यासाठी जर कोणी एकत्र येऊ इच्छित असेल, तर आम्ही तयार आहोत. मात्र, ही आघाडी आदर आणि समानतेवर आधारित असली पाहिजे. आम्ही इतरांसाठी केवळ पायघडी अंथरणे स्वीकारणार नाही. चर्चा राजकीय सहभाग आणि सत्तेतील न्याय्य वाट्यावर आधारित असली पाहिजे."
इंडिया ब्लॉक आणि बीएसपी
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, एआयएमआयएमने उत्तर प्रदेशात अपना दल (कम्युनिस्ट) सोबत युती करून निवडणूक लढवली. त्यांनी आपल्या निवेदनात कोणत्याही पक्षाचे थेट नाव घेतलेले नाही, यावरून असे सूचित होते की ते इंडिया ब्लॉक, विशेषतः समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी करण्यास तयार आहेत .
मात्र, जर बहुजन समाज पक्षाने एकट्यानेच निवडणुका लढवल्या, तर ओवैसी पुन्हा एकदा मायावतींच्या पक्षासोबत युतीची शक्यता पडताळून पाहू शकतात. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण सुमारे १९% आहे , परंतु असे अनेक भाग आहेत जिथे त्यांची लोकसंख्या खूप प्रभावशाली आहे आणि तेच निवडणुकीचे निकाल ठरवतात.