कोकणवासियांना रेल्वेने दिली खूषखबर !
मुंबई-सावंतवाडी दैनंदिन एक्स्प्रेसला रेल्वे बोर्डाची मंजुरी
दीपक शिंगण
रत्नागिरी : कोकणातील रेल्वे प्रवासी तसेच पर्यटकांच्या दृष्टीने भारतीय रेल्वेने शनिवारी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ही नवीन रेल्वे सेवा 510 किलोमीटर मार्गावर दररोज धावणार असून यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील प्रवाशांची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड एक्सप्रेस या गाडीचा क्रमांक 15087 असून 15088 या क्रमांकाने सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही फेरी चालवण्यात येणार आहे. ही गाडी रोज धावणार आहे. कोकणसाठी स्वतंत्र गाडी मागील अनेक वर्षात सुरू न झाल्याने या मार्गे गोवा तसेच दक्षिणेतील राज्यांमध्ये ये-जा करणाऱ्या गाड्यांमध्ये जागा मिळवताना कोकणवासीय प्रवासी जनतेला गैरसोईला सामोरे जावे लागत होते. शनिवारी रेल्वे बोर्डाने कोकणसाठी स्वतंत्र तीही रोज धावणारी कायमस्वरूपी गाडी जाहीर केल्याने कोकणसाठी गणेशोत्सवाच्या तोंडावर ही खूषखबर ठरली आहे.
कोकणवासीय व्यावसायिक, विद्यार्थी, ऊग्ण आणि पर्यटकांसाठी थेट रेल्वे सेवेचा पर्याय कोकणला मिळालेल्या या नवीन मिळालेल्या गाडीमुळे उपलब्ध झाला आहे.
असे आहेत थांबे
प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला कोकण मार्गावरील 22 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. मुंबई व उपनगर क्षेत्रात दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.