घटनात्मक मूल्यांवर मिरामारमध्ये मंथन; एआयएलयू गोवा शाखेचे 5 वे राज्य अधिवेशन
पणजी : घटनात्मक मूल्ये आणि समकालीन कायदेशीर आव्हानांवर विचारमंथन करण्यासाठी ऑल इंडिया लॉयर्स युनियन (AILU), गोवा शाखेच्या 5व्या राज्य अधिवेशनाचे आयोजन मिरामार येथील व्ही. एम. साळगावकर कॉलेज ऑफ लॉ येथे करण्यात आले.
अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात कायदे क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ वकील आणि संविधान अभ्यासकांनी न्यायव्यवस्था, नागरी हक्क, धर्मनिरपेक्षता आणि कायद्याचे राज्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. बदलत्या सामाजिक आणि कायदेशीर परिस्थितीत घटनात्मक मूल्यांचे संरक्षण करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
या अधिवेशनाला AILU गोवा राज्य शाखेचे अध्यक्ष ॲड. व्हिक्टर सॅव्हिओ ब्रागांका यांच्यासह ॲड. हर्षा नाईक, ॲड. सेलेरिना डी'सा, ॲड. अनिल कुमार चौहान, ॲड. क्लिओफात कुतिन्हो, ॲड. प्रसेनजीत ढगे आणि ॲड. निकोलस डी'मेलो आदी उपस्थित होते.
वकील, कायद्याचे विद्यार्थी व प्राध्यापकांसह पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांसाठीही अधिवेशनातील चर्चेचे विषय महत्त्वाचे ठरले. घटनात्मक मूल्ये आणि समकालीन आव्हानांवर व्यापक चर्चा घडवून आणणे हा अधिवेशनाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.