वैभव सूर्यवंशी राजस्थानसाठी संकटमोचक?
आयपीएल 2026 स्पर्धा 58 दिवस आणि 68 सामन्यानंतर आता अंतिम टप्प्यात आहे. प्लेऑफ मध्ये बेंगळूर, गुजरात, आणि हैदराबाद या तीन संघांनी धडक मारली आहे.या स्पर्धेमध्ये लढत आहे ती चौथ्या संघाविषयी या स्थानासाठी राजस्थान रॉयल्स, पंजाब, कोलकाता आणि दिल्ली यांच्यात चुरस होणार आहे, त्यात राजस्थान रॉयल्स प्रमुख दावेदार राहणार आहेत.
स्पर्धेतील साखळी सामन्याचा आज हा अखेरचा दिवस आहे मुंबई वि.राजस्थान सामना उद्या वानखेडे स्टेडीयमवर रंगणार तर राजस्थान संघाला चौथे स्थानमिळविण्यासाठी अतिशय चमकदार कामगिरी करावी लागणार आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे राजस्थान संघाची मदार असेल 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीवर.या आठवड्यात वैभवने लखनऊ विरुद्ध 93 धावांची भन्नाट खेळी करून राजस्थानला मोठा विजय मिळवून देण्यास महत्वाची भूमिका बजावली होती. आता मुंबई विरुद्ध मोठा विजय मिळवून पुढील अंतिम फेरीकडे वाटचाल करण्याचे स्वप्न बाळगताना राजस्थान संघ अर्थातच वैभवकडे मोठ्या आशेने पहात असणार हे उघड आहे. 19 मे रोजी लखनऊ संघा विरुद्ध वैभवने 10 उत्तुंग षटकार आणि 7 दणदणीत चौकार ठोकले. यावरून त्याची बॅट काय करामत करू शकते याची कल्पना येईल.वानखेडेची खेळपट्टी फलंदाजी आणि नंतर स्विंग गोलंदाजीस साथ देईल अशी शक्यता असल्याने सामना अटीतटीचा होणे अपेक्षित आहे.
दोन्ही संघातील लढतीचा आढावा घेऊ
राजस्थान सर्वोच्च संघ धावसंख्या: 212/7 ( 2023)
मुंबई सर्वोच्च संघ धावसंख्या: 217/2 (2025)
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: 124 यशस्वी जैस्वाल ( 2023)
मुंबई सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: 95 अँडरसन (2014)
राजस्थान सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी: 5/18 संदीप शर्मा ( 2024)
मुंबई सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी: 4/14 नॅथन कुल्टर-नाईल ( 2021)
मुंबई संघ यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर गेला आहे. तथापि या संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समिती सहित क्रीडा रसिकांचे लक्ष निश्चित असेल. हे खेळाडू म्हणजे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह. राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीसाठी, भारतीय संघातील निवड पक्की करण्याची संधी आहे.आज मुंबईच्या रणरणत्या उन्हात राजस्थान संघाने शनिवारी दुपारी 2 पासून तर मुंबई संघाने 3 पासून जोरदार सराव सुरु केला आहे.