For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एआय बदलणार युद्धाचे स्वरुप !

06:27 AM Sep 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
एआय बदलणार युद्धाचे स्वरुप
Advertisement

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन : आजची कल्पना उद्याच्या लष्करी क्षमतेचा आधार

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भविष्यातील युद्धाचे स्वरुप झपाट्याने बदलत असून त्यामुळे तांत्रिक आघाडी हीच रणनीतिक आघाडी ठरवणार आहे असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. डीआरडीओतर्फे आयोजित ‘डीआरडीओ-इंडस्ट्री सिनर्जी मीट : विमर्श 2026’ या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानांच्या महत्त्वावर भर दिला.

Advertisement

2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम राष्ट्र निर्माण करण्यापुरते मर्यादित नसून, तांत्रिकदृष्ट्या आत्मनिर्भर, सामाजिकदृष्ट्या सर्वसमावेशक, पर्यावरणपूरक आणि रणनीतिकदृष्ट्या सुरक्षित भारत घडवणे हे त्यामागील व्यापक उद्दिष्ट असल्याचे सिंह यांनी सांगितले. या उद्दिष्टाच्या पूर्ततेत संरक्षण क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेवर भर

2047 पर्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता मिळवणे, स्वदेशी सामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवणे आणि संरक्षण निर्यातीत लक्षणीय वाढ करणे आवश्यक आहे. जागतिक पुरवठा साखळीत भारताची मजबूत भूमिका निर्माण करण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील सर्व घटकांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

डीआरडीओ-उद्योग सहकार्य

डीआरडीओ आणि उद्योगांमधील भागीदारी केवळ उत्पादनापुरती मर्यादित न ठेवता संशोधन, डिझाइन, चाचणी, प्रमाणन आणि उत्पादन या संपूर्ण प्रक्रियेत विस्तारली पाहिजे असे सिंह यांनी सांगितले. मोठ्या कंपन्यांसोबत एमएसएमई आणि स्टार्टअप्सनाही या संपूर्ण प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एआर, ड्रोन ठरणार निर्णायक

भविष्यातील युद्धात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोनसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील तांत्रिक नवकल्पनांचा वेग आणखी वाढविण्याची गरज आहे. आज आपण ज्या तंत्रज्ञानाची कल्पना करत आहोत, तेच उद्याच्या लष्करी क्षमतेचा आधार ठरेल. भविष्यातील तंत्रज्ञानाची केवळ कल्पना करण्याऐवजी ते आजच विकसित करण्याची गरज असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

तंत्रज्ञानात आघाडी

पुढील 40-50 वर्षांनंतर भारताला ज्या स्वरुपात पाहायचे आहे, त्याची कल्पना आजच करणे आवश्यक आहे. नव्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनाच भविष्यात तांत्रिक नेतृत्व मिळेल. भविष्यातील युद्धात रणनीतिक आघाडी मिळवायची असेल, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेतृत्व करणे अपरिहार्य आहे असा संदेशही राजनाथ सिंह यांनी दिला.

Advertisement
Tags :

.