महामार्ग निर्मितीत ‘एआय’ची एंट्री
20 किमीपेक्षा अधिक लांबीच्या प्रकल्पात ‘एआय-एमसी’ अनिवार्य
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
राष्ट्रीय महामार्गांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मोठे पाऊल उचलले आहे. प्राधिकरणाने 20 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या आणि 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणाऱ्या सर्व महामार्ग प्रकल्पांसाठी ‘ऑटोमटेड अँड इंटेलिजेंट मशीन-अॅडेड कंस्ट्रक्शन’ (एआय-एमसी)ला अनिवार्य केले आहे. हे पाऊल गुणवत्तेशी निगडित समस्या दूर करण्यासाठी उचलण्यात आले आहे. नव्या व्यवस्थेच्या अंतर्गत कंत्राटदारांना रस्तेनिर्मितीच्या प्रारंभापासून पूर्ण प्रकल्पाच्या प्रत्येक हिस्स्यात एआय-एमसी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. याचा वापर एम्बँकमेंट, सबग्रेड आणि गॅन्युलर सब-बेस (जीएसबी) समवेत महामार्गाच्या सर्व प्रमुख थरांच्या निर्मितीत केला जाईल.
मशीन्समध्ये सेंसर
एआय-एमसीमध्ये ग्रेडर, पेवर, कॉम्पॅक्टर आणि डोजर यासारख्या अवजड मशीन्समध्ये ऑन-बोर्ड कॉम्प्युटर आणि सेंसर लावण्यात येतात. त्यांच्याद्वारे निर्मितीकार्याची प्रत्यक्ष देखरेख, गुणवत्ता नियंत्रण आणि डिजिटल रिकॉर्डिंग शक्य होते. यामुळे मानवी चुका कमी होतील आणि रस्ते निर्मितीत एकरुपता आणि अचूकता वाढेल असे सरकारचे मानणे आहे.
रियल-टाइम डाटा
नव्या नियमांच्या अंतर्गत रियल-टाइम डाटा शेअर करणे आवश्यक आहे. हा नियम कंत्राटदार आणि प्राधिकरण दोघांसाठी उपयुक्त आहे. कंत्राटदाराला रियल-टाइम डाटा मिळाल्यास उपकंत्राटदारासाठी कामात निष्काळजीपणा बाळगणे अवघड ठरेल असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
एक्स्प्रेसवेमध्ये वापर
एआय-एमसीचा वापर सर्वप्रथम लखनौ-कानपूर एक्स्प्रेसवेच्या निर्मितीदरम्यान झाला होता. परंतु तेथे पूर्ण प्रकल्प आणि सर्व निर्माण थरांमध्ये याचा वापर झाला नव्हता. आता प्राधिकरणाने एआय-एमसी मोठ्या प्रकल्पांमध्ये व्यापक आणि अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.