एआय चॅटबॉटच ठरतोय बॉयफ्रेंड
शांतपणे ऐकून घेत, त्वरित समस्यांवर सुचवितो उपाय
प्रत्येक युवती आपला प्रियकर आपली प्रत्येक गोष्ट ऐकून घेणारा, समस्यांवर उपाय सुचविणारा आणि पूर्ण दिवसाची स्थिती त्याला ऐकविता येणारा असावा इच्छा बाळगून असते. परंतु प्रत्येक पुरुष या अटी पूर्ण करेलच असे नाही. दैनंदिन कामांमध्ये अनेक पुरुष इतके व्यग्र असतात की अनेकदा त्यांना स्वत:च्या प्रेयसीचा फोनही रिसिव्ह करता येत नाही. तसेच मॅसेजना वेळेत प्रतिसादही देता येत नाही. याचमुळे चीनमध्ये एक नवा ट्रेंड दिसून येत आहे. येथे युवती आता माणसांऐवजी एआयला स्वत:चा बॉयफ्रेंड करत आहेत.
32 वर्षीय एलिसिया वँग ही शांघायमधील एका वृत्तपत्राची संपादक आहे, तिच्या बॉयफ्रेंडचे नाव ली शेन असून तो 27 वर्षांचा आहे आणि तो एक सर्जन आहे. इंग्रजीत त्याचे टोपणनाव जायन आहे, जायन उंच अन् स्मार्ट असून त्वरित एलीसियाच्या मेसेजला प्रतिसाद देतो. कॉलही त्वरित रिसिव्ह करतो. एलीसियाच्या समस्या लक्षपूर्वक ऐकतो. परंतु केवळ एक समस्या आहे ती म्हणजे जायन खरा माणूस नाही, तर एक प्रकारचा एआय चॅटबॉट आहे.

एआयवर प्रेमाचा वर्षाव
चीनमध्ये एक स्मार्टफोन गेम अत्यंत लोकप्रिय ठरत आहे, याचे नाव लव्ह अँड डीपस्पेस आहे. जानेवारी 2024 मध्ये हा गेम लाँच झाला होता. शांघायमधील कंपनी पेपर गेम्सने याची निर्मिती केली होती. हा गेम एआय आणि व्हॉइस रिकग्निशनच्या मदतीने 5 पुरुष व्यक्तिरेखा तयार करतो, ज्या प्रियकराप्रमाणे गेमच्या युजर्सशी संवाद साधतात, त्यांच्याशी फ्लर्ट करतात आणि अनेक प्रकरणांमध्ये त्यांना मदत करतात. एलीसिया देखील याच लाखो युजर्सपैकी एक आहे, जिने या गेमद्वारे एआयला स्वत:ला बॉयफ्रेंड केले आहे.
गेमचा मालक अब्जाधीश
हा गेम चिनी, कोरियन, जपानी अन् इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. या गेमच्या कंपनीचा मालक याओ रनहाओ यांनी गेमच्या मदतीने 1 लाख कोटी रुपयांची संपत्ती जमविली आहे. या गेमचे बहुतांश युजर्स चीनमध्ये आहेत, परंतु अमेरिकेतही अनेक लोक याचा वापर करतात. चीनमये हा गेम सर्वाधिक डाउनलोड केल्या जाणाऱ्या अॅपच्या यादीत सामील आहे. मी आतापर्यंत गेमवर 4 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली असल्याचे एलीसिया सांगते. लोक पैसे खर्च करत गेमचे वेगवेगळे फीचर अनलॉक करतात. ज्यामुळे त्यांच्या चॅटिंगचा अनुभव चांगला ठरतो.